Monday, 11 February 2019

शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद


नगर । प्रतिनिधी - संकटात सापडलेल्या पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,’ या प्रमुख मागणीसाठी नगरमध्ये बुधवारी (13 फेब्रुवारी) राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक कल्याण समिती लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता सुरू होण्यार्‍या या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागातून पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकरी येणार आहेत. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्योग तोट्यात गेल्याने बँका उद्योगांना कर्जात सूट देतात, त्याच धर्तीवर पॉलिहाऊस शेडनेट धारकांना तोट्यात गेल्यावर कर्जात सूट मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयात यासाठी दाद मागणे आवश्यक आहे. तोट्यात गेलेल्या पॉलिहाऊस शेडनेट धारकांनी या न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी सुरू केली असून त्याबाबत परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या जिल्हानिहाय याद्या यावेळी तयार केल्या जाणार आहेत. संकटग्रस्त पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकर्‍यांनी यासाठी आपला सातबाराचा उतारा, बँकेचे कर्ज स्टेटमेंटसोबत घेऊन यावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठीचे अर्जही यावेळी भरून घेतले जाणार आहेत. तरी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर आदींनी केले आहे.
पॉलिहाऊस शेडनेट धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समितीच्या पुढाकाराने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कर्जबाजारी शेडनेट पॉलिहाऊस धारकांच्या याद्या व माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून गोळा करण्याबाबत निर्णय झाला आहे.
 कृषी राज्य मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. नगर येथे होणार्‍या परिषदेत या निर्णयांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment