Thursday, 28 February 2019

ससेहोलपट थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांचा ठिय्या


नगर । प्रतिनिधी -  जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी अपंग दाखल्यांसाठी येणार्‍या दिव्यांग बांधवांची ससेहोलपट थांबून एकाच दिवशी तपासणी करुन त्याच दिवशी दिव्यांगांना दाखले देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आले. 
प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे, विनोदसिंग परदेशी, अजित धस, बाबासाहेब महापुरे, प्रकाश बेरड, लक्ष्मीबाई देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 
दाखल्यासाठी दिव्यांग बांधवांना हालअपेष्टा सहन करावी लागत असताना अचानकपणे आंदोलन करण्यात आल्याने काही वेळ अपंग दाखल्यांचे कामकाज कोलमडले होते. बुधवारी अपंग दाखल्याच्या कामासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अपंग बांधव येत असतात. कर्मचार्‍यांची मुजोरी व जिल्हा रुग्णालयाच्या कार्यशैलीमुळे तासन्तास रांगेत उपाशीपोटी दिव्यांगांना उभे रहावे लागते. दिव्यांगांचे हाल पाहून देखील कुठलेही सोयरसुतक नसलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. डॉ.मुरंबीकर यांनी तपासणी करुन तातडीने अपंग दाखले देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 
जिल्हा रुग्णालयात अपंगांची तपासणी होऊन त्यांना दाखले देण्याचे कामकाज दिवसभर चालू होते. तर 12 वा. बंद होणारी केस पेपरची खिडकी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू होती.   
अपंग दाखला मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शक फलक लावण्यात यावे, जुने प्रमाणपत्र अवैध केल्यानंतर नवीन प्रमाणपत्र त्याच दिवशी द्यावे, तासनतास रांगेत थांबणार्‍या दिव्यांग बांधवांना टोकन देऊन कामकाज करावे, वेटिंग रुमची सेवा उपलब्ध करावी, अपंग दाखल्यासाठी येणार्‍या दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक द्यावी, व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध करावी, बुधवारी अपंग दाखल्यासाठी सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी पूर्णवेळ थांबावे, आठवड्यातून दोन दिवस अपंग दाखल्यांचे कामकाज चालवावे, कर्णबधीर, मूकबधीर, डोळे तपासणी जिल्हा रुग्णायलातच करावी, वरील मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करावी अन्यथा सर्व सुविधा खालच्या मजल्यावरच उपलब्ध करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment