Saturday, 16 February 2019

महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात महापौर-उपमहापौरांनी ठोकला दोन तास तळ!


नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी तसेच विवाह नोंदणी विभागात दाखले घेण्यासाठी नागरिकांना या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी (दि.15) दुपारी उपमहापौर मालन ढोणे यांच्यासमवेत या कार्यालयात अचानक भेट देवून सुमारे 2 तास या ठिकाणी तळ ठोकला. दाखल्यांसाठी नागरिकांची झालेली गर्दी पाहता तातडीने वाढीव कर्मचारी नेमून दाखल्यांचे वितरण सुरळीत केले.
महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी महापौर वाकळे यांनी बुधवार (दि.13) पासून कर्मचार्‍यांची विभागनिहाय ओळख परेड सुरु केली आहे. शुक्रवारी (दि.15) दुपारी त्यांनी उपमहापौर मालन ढोणे यांच्या समवेत माळीवाडा प्रभाग समिती कार्यालयास अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नागरिकांची दाखले घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे आढळून आले. त्यांनी एकदम कार्यालयात न जाता बराच वेळ खिडकी शेजारी उभे राहून आतील कामकाजाची पाहणी केली. दाखले देण्याचे काम संथ गतीने सुरु होते. तेथे कर्मचारीही कमी होते, त्यामुळे नागरिकांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत होते. हे पाहून त्यांनी तातडीने या ठिकाणी वाढीव कर्मचारी बोलावले. त्यांना कामाचा वेग वाढवायला लावला तसेच विविध सूचना केल्या. त्यानंतर दाखले वितरणाचे काम सुरळीत झाले व कार्यालयात जेवढे नागरिक दाखले घेण्यासाठी आले होते त्या सर्वांना दाखले वितरीत करण्यात आले. दाखल्यासाठी आम्ही गेल्या 8 दिवसांपासून दररोज हेलपाटे मारत होतो, असे काही नागरिकांनी यावेळी सांगितले.  

No comments:

Post a Comment