नगर । प्रतिनिधी - वाहनचालकांनी आपले वाहन रस्त्यावर आणताना त्यांना नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याबरोबरच दुसर्या वाहनचालकांनाही त्रास न होता काळजी घ्यावी. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांचे इन्शुरन्स नियमित भरण्याची काळजी घ्यावी. पालकांनीही आपल्या मुलांना हातात वाहन देताना वाहनाचा वेग न वाढविता व दिशादर्शक फलकांकडे लक्ष देऊन वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी भारतभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यावर्षीच्या 30व्या सुरक्षा अभियानाचा समारोप पोलिस मुख्यालयातील बँक्वेट हॉल येथे झाला. याप्रसंगी खासदार गांधी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, वीज मंडळाचे विजय गिते, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप, आरटीओ अधिकारी सलीम मुन्शी, अनुश्री केंदळे, टी. के. धायगुडे, श्वेता कुलकर्णी, अर्चना फटांगरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात दीपक पाटील म्हणाले, हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. रस्ते अपघातात देशामध्ये दरवर्षी एक ते दीड लाखजण मृत्युमुखी पडतात. नागरिकांचे प्रबोधन होण्यासाठी, जनजागृतीसाठी हा कार्यक्रम घेतला जातो. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे, टेपरेकॉर्डर काढणे हा कार्यक्रम राबविण्यात आला. शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधनावर भर देण्यात आला. या सप्ताहामध्ये ओव्हरलोड, फिटनेस, हेल्मेट आदि बाबींची पूर्तता न करणार्यांवर केसेस करून मोठ्या प्रमाणावर दंडवसुली करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. श्री. शर्मा म्हणाले, रस्त्याचे नियम पाळल्यास अपघात कमी होतील. घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यास काय परिस्थिती होते, हे घरातील लोकांनाच माहिती असते. तेव्हा वाहन चालविता येत नसेल तर रस्त्यावर वाहन आणू नये. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरटीओ अधिकारी विनोद घनवट यांनी केले, तर आभार शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ड्राईंग स्कूलचे संचालक, विविध खात्यांतील अधिकारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment