नगर । प्रतिनिधी - जम्मू-काश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात काल (गुरुवार) दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर केलेल्या हल्ल्याचे आज (शुक्रवार) नगर शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीयांसह विविध संघटनांनी दहशतवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा, पाकिस्तानचा झेेंडा जाळून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादीने काल (गुरुवार) रात्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह गुणे चौक ते वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत कॅण्डल मार्च काढून या घटनेचा निषेध केला. यावेळी आ. अरुण जगताप, प्रा. माणिकराव विधाते यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदविला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज खान, शामराव वागस्कर, अनिस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment