नगर । प्रतिनिधी - लोकसभा किंवा अन्य निवडणुका लागल्या की अर्बन बँकेच्या माध्यमातून बँकेचे चेअरमन व खासदार दिलीप गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न व्यक्तिद्वेषानेे काही लोक करीत असतात. परंतु तुमच्या राजकारणासाठी शतकोत्तरी प्रवासात असणार्या सर्वांत जुन्या व सुस्थितीत असलेल्या आपल्या अर्बन बँकेला त्रास देण्याचा प्रयत्न काही विशिष्ट लोकांनी करू नये, असे विनंतीवजा पत्रक सभासदांच्या वतीने सुनील परदेशी, प्रशांत मुथा, अनिल डागा, कमलेश गांधी, श्रीकांत साठे आदी सभासदांनी काढले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, खासदार गांधी हे तीनवेळा प्रत्येक वेळेस वाढत्या मताधिक्क्याने निवडून आलेले आहेत. त्यांची लोकप्रियता व यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व बाबी काही ठरावीक लोकांनाच खटकतातच की काय असे वाटते. अर्बन बँकेमध्ये तथाकथित गैरप्रकार झाला असेल तर त्याचा न्यायनिवाडा ‘अर्बन’च्या निवडणुकीत सभासद करतील. त्यामुळे लाखोंच्या व्यावसायिक व सामाजिक जीवनात सिंहाचा वाटा असणार्या बँकेला कोणीही वेठीस धरू नये. हा प्रकार म्हणजे आपण बसलो, तीच फांदी आपल्या हाताने तोडण्यासारखे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
‘खटाटोपा’ची सुज्ञ सभासदांना जाणीव!
सध्या बँकिंगमधील गळेकापू स्पर्धा, राष्ट्रीयीकृत बँकांसह वाढते एनपीए या समस्या सर्वच बँकांमध्ये आहेत. सामान्यपणे वर्षअखेरीस प्रत्येक बँक एनपीए कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असते. अर्बन बँकेच्या निरंतर वाढत असणार्या ठेवी हे सभासदांच्या बँकेवरील भक्कम विश्वासाचे प्रतीक आहे. वेळोवेळी व विनाकारण बँकेच्या माध्यमातून आपण करीत असलेल्या ‘खटाटोपा’ची सूज्ञ सभासद व नगरकरांना जाणीव आहे. त्यामुळे वैयक्तिक द्वेष व राजकारणाकरिता शतकोत्तरी वाटचाल करणार्या आपल्या अर्बन बँक व परिवारास त्रास देऊ नये, असेही पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment