नगर । प्रतिनिधी - नवनागापूर येथे जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरी गडावरुन ज्योत घेऊन आले. ज्योत घेऊन आल्यानंतर प्रथमत: काश्मीर पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व नवनागापूरचे उपसरपंच डॉ.बबनराव डोंगरे यांच्या हस्ते शिवपूजन व आरती झाली. संध्याकाळी 6 वा. सनफार्मा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने मिरवणुकीला सुरवात झाली.
मिरवणूक संपल्यानंतर 8 वा. शिवशाहीर विक्रमसिंह आवचित्ते, शिवमती तेजस्विनीताई जाधव, शिवश्री अॅड.शिवाजीराव झनझने यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले.
शिवमती जाधव म्हणाल्या शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून व कानात बाळ्या घालून कॉलेजसमोर जावून मुलींना छेडण्यापेक्षा एखाद्या संकटात सापडलेल्या मुलीला मदत करुन, भुकलेल्या अन्न देवून, गाईला चारा देवून, अपघातग्रस्तांना मदत करुन आपला शिवधर्म पाळावा.
शिवश्री झनझने म्हणाले जिजाऊंसारखे प्रत्येक मातेने एक शिवाजी घडविण्यासाठी प्रयत्न करावे. शिवशाहीर आवचित्ते म्हणाले, ज्या राजाने परस्त्रीला मातेप्रमाणे वागणूक दिली त्या राजाचा आदर्श घेवून आपणही समाजातील स्त्रीयांना सन्मानाची वागणूक देवून त्यांचा आदर करावा व शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन त्यांचे गुण आपल्या रक्तात भिनवून शिवजयंती साजरी करावी.
प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी डी.जे.सारख्या वाद्याला फाटा देत पारंपरिक पद्धतीने ढोल व लेझीम पथकाच्या वाद्यात मिरवणूक काढल्यामुळे शिवशाहिर आवचित्ते यांनी प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले. शेवटी अफजल खानाचा वध हा पोवाडा गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश आरडे, खजिनदार योगेश आरडे, गणेश शिंदे, दीपक खुळे, उदय कांडके, सत्यम पडवह, विकास झा, स्वप्नील खामकर, सचिन श्रीराम, राहुल पाटील, अमोल शिंदे, किरण तलवार, बाळू मोरे, शैलेश दाते, विकी गायकवाड, अनिल पवार, रोहीत रोकडे व राहुल ठेंगडे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब सप्रे, माजी ग्रा.पं. सदस्य मंगलताई गोरे, गोरक्षनाथ गव्हाणे, संजय कुसळकर, उद्योजक दत्ताशेठ चौरे, संतोष रोकडे, रत्नाकांत दरेकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री पठारे महाराज यांनी केले.
No comments:
Post a Comment