Monday, 18 February 2019

जवानांसाठी प्रत्येकाने आर्थिक योगदान देण्याची गरज ः श्यामसुंदर सारडा


नगर । प्रतिनिधी - पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. आता निषेध करून थांबून चालणार नाही, तर योग्य ती पावले उचलावी लागणार आहेत. सैन्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून भारताला अधिक बलवान करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा देशासाठी द्यावा. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी असून, प्रत्येकाने आपापल्या परीने आर्थिक योगदान दिल्यास संरक्षण विभाग अधिक मजबूत होईल. भारताने पाकला जशास तसे उत्तर द्यावे, असे प्रतिपादन व्यापारी श्यामसुंदर सारडा यांनी केले.
कापड व्यापारी असोसिएशन, एम.जी. रोड व्यापारी असोसिएशन, आदर्श व्यापारी मित्रमंडळ व महावीर चषक परिवाराच्या वतीने कँडल मार्च काढून पुलवामामधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संजय चोपडा, श्याम देवळालीकर, राजेंद्र गांधी, राजेंद्र ताथेड, किरण व्होरा, सचिन चोपडा, रजनीकांत गांधी, संजय भंडारी, रसिक चोपडा, डॉ. सचिन बोरा, प्रितम पोखर्णा, अतुल शेटिया, अजय बोरा, प्रेमराज पोखर्णा, घनश्याम घोलप, अजय गांधी, दिलीप डुंगरवाल, धिरज मुनोत, विजय मुनोत, ईश्वर बोरा, प्रतीक बोगावत, संभव काठेड, के. पी. सिंगे, रवी किथानी, अमोल देडगांवकर आदींसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी किरण व्होरा म्हणाले की, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपले रक्षण करणार्‍या जवानांना, त्यांच्या कुटुंबियाने प्रत्येकाने मदत केली पाहिजे. कापड व्यापारी असोसिएशनच्या वतीने जवानांचा सन्मान करून त्यांना सवलतीच्या दरात खरेदीसाठी प्रयत्न करील. देशातील प्रत्येक नागरिक या भ्याड हल्ल्याची निंदा करीत असून, भारताने बदला घ्यावा. पाकला नेस्तनाबूत करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
संजय चोपडा म्हणाले, केंद्र सरकारने आता पाकचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कठोर पावले उचलावीत. सर्व देश पाठीशी ठामपणे उभा आहे. यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

No comments:

Post a Comment