नगर । प्रतिनिधी - जिल्हाधिकारी कार्यालयावर काल (बुधवार) विनापरवाना मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवलेंसह 250 ते 300 शेतकर्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉलिहाऊस व शेडनेट धारक शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, यासह विविध मागण्यांसाठी काल (बुधवार) राज्यातील पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकर्यांची राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद झाली. या परिषदेनंतर बुधवारी (दि. 13) दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी निदर्शने करुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दि. 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक आदेश जारी केले होते. या आदेशाचा भंग करुन विनापरवाना मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मनोज गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन नवले यांच्यासह सुमारे 300 शेतकर्यांवर कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सोनार करीत आहेत.
No comments:
Post a Comment