Thursday, 28 February 2019

गुलमोहर रस्त्यावर कारची स्कूलबसला धडक


नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर आज (गुरुवार) सकाळी एका खासगी शाळेच्या बसला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारचालक जखमी झाला असून कारचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील विद्यार्थी सुखरुप राहिले. खड्डेमय, अरुंद रस्त्यांमुळे सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी, पाईपलाईन, गुलमोहर रस्त्यावर अपघात होत आहेत.
गुलमोहर पोलिस चौकात आज सकाळी 8 वा. खाजगी शाळेची एक बस थांबली होती. या रस्त्याने जाणार्‍या कारने बसच्या मागील बाजूस धडक दिली. यात कारचालकाच्या डोक्याला मार लागला. बस चालकाने नागरिकांच्या मदतीने या कारचालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
 या बसमध्ये विद्यार्थी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही. या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून या रस्त्यांची रुंदी करण्याची व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment