नगर । प्रतिनिधी - शहरातील एका नामांकित बँकेत गोल्ड लोन लिलावावेळी बनावट सोने आढळून आल्याने लिलाव स्थगित करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ही बँक पुन्हा वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेच्या लक्षात आल्यावर लगेच त्यानी पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
नगर शहरातील एका नामवंत बँकेत बुधवारी (दि. 27) गोल्ड लोनसाठी ठेवण्यात आलेल्या सोन्याचा लिलाव निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी 26 बॅग होत्या. त्या बॅगमध्ये किती सोेने होते याची मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. बँकेने लिलावासाठी सर्व 26 बॅग बाहेर काढल्या. त्यावेळी पहिल्या तीन बॅगमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे सर्वच अस्वस्थ झाले. या तिन्ही बॅगेचा कुठल्याही प्रकारे लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने लगेचच पंचनामा करुन घेतला. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. दरम्यान, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या असल्या तरी त्यावर बँकेकडून केव्हा निर्णय घेण्यात येतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment