नगर । प्रतिनिधी - जनसेवा फाउंडेशन व डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नगर जिल्ह्यामध्ये 30 पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे घेतली असून, सुमारे साठ हजारपेक्षा जास्त रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. या शिबिराचा उपयोग राजकीय व्यासपीठ म्हणून केला जातो असा आरोप काहीजण करतात. परंतु ही शिबिरे राजकारणासाठी घेत नसल्याचा दावा करीत अशा बोलघेवड्या पुढार्यांनी रुग्णसेवेच्या आड येऊ नये, अशी टीका युवा नेते सुजय विखे यांनी केली.
जनसेवा फाउंडेशन व डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेऊर बायजाबाईचे (ता. नगर) येथील 31व्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. विखे पुढे म्हणाले की, जनसेवा फाउंडेशन मार्फत घेतल्या जाणार्या आरोग्य शिबिरांना गालबोट लावण्याचे प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळी करत आहेत. माझ्यावर आरोप करणारे पुढारी स्वतः काही करीत नाहीत.
मी डॉक्टर आहे म्हणूनच आरोग्य शिबिर घेतो व रुग्णांची रुग्णसेवा करतो. लोकांचा विखे कुटुंबावर विश्वास आहे तोपर्यंत आपण कुठल्याही आरोपाला घाबरत नाही. किंबहुना अशा आरोपांना प्रत्युत्तर देण्याची गरज आपल्याला वाटत नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी गोविंद मोकाटे म्हणाले की, नगर तालुक्याची अवस्था बिहारसारखी झाली आहे व ही अवस्था जर सुधारायची असेल तर आपल्याला एखाद्या सुशिक्षित, सक्षम लोकप्रतिनिधी गरज आहे. दरम्यान, यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व सत्काराला फाटा देण्यात आला.
No comments:
Post a Comment