Monday, 18 February 2019

पालिकेने ठराव करून 9 वर्षे उलटली तरी दफनभूमीसाठी जागा मिळेना


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिका हद्दीतील नालेगांव येथील सर्व्हे नं. 220 व 221 मधील जागा ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी देण्याचा ठराव 9 वर्षापूर्वी महापालिकेने केलेला आहे. मात्र या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची कैफियत ख्रिश्चन समाजाच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड अ‍ॅण्ड पास्टर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे मांडली. ही जागा मोजून द्यावी तसेच त्या जागेला कंपाउंड करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष रेव्ह. शामुवेल भिंगारदिवे,उपाध्यक्ष  रेव्ह. दिपक पाडळे, सेक्रेटरी  रेव्ह. सुधाकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली रेव्ह. बिशप एम.एस.सावंत, दिपक थोरात, शामुवेल नाईक, आशिष सावंत, सुमंत सोनवणे, संजय घाटविसावे, मोझेस नेटके, स्टेव्हन बल्लाळ,शामुवेल मगर, तानाजी पाडळे, ए.डी. नाईक, सुनील गंगावणे, रेव्ह. मकासरे, मदन खंडागळे, एम.एस.पडागळे, प्रकाश बनसोडे, संजीवन बल्लाळ, जोन्स साने, सुनील बोर्डे, सुनील वाघमारे, संदीप बनकर, चंद्रहास पिल्ले, रॉबिन सालोमन, रेव्ह. विल्यम्स, अनिल भोसले, परेश साळवी आदींच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.16) दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, महापालिकेने शहरातील ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीसाठी नालेगांव येथील सर्व्हे नं. 220 व 221 मधील जागा  देण्याचा ठराव प्रस्ताव क्र. 60 नुसार दि. 25/10/2010 रोजी मंजूर केलेला आहे. परंतु वेळोवेळी पाठपुरावा करून अद्याप ती जागा ख्रिश्चन समाजाच्या ताब्यात अंत्यविधी करण्यासाठी मिळालेली नाही. सध्या नगर शहरातील ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी खूपच अडचणी निर्माण होत आहेत. ब-याच वेळा अंत्यविधी करण्यासाठी दफनभूमी उपलब्ध नसल्यामुळे समाजाचे लोकांना आपआपल्या गावी अंत्यविधी करण्यासाठी घेऊन जावे लागते. ख्रिश्चन समाजाच्या वतीने अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरड अ‍ॅण्ड पास्टर्स असोसिएशन ही संघटना ख्रिश्चन समाजाच्या कल्याणकारी सेवेसाठी कार्य करत आहे. तरी सदर जागा अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरड अ‍ॅण्ड पास्टर्स असोसिएशन च्या अधिपत्याखाली देखरेख करण्यासाठी सुपूर्त करण्यात यावी, सदर जागेचे मोजमाप करून कंपाउंड व लाईट, पाणी, प्रार्थना मंडप इ. सुविधा उपलब्ध करून यावेत, अहमदनगर डिस्ट्रिक्ट  रेव्हरंड अ‍ॅण्ड पास्टर्स असोसिएशन च्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी महापौर वाकळे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

No comments:

Post a Comment