नगर । प्रतिनिधी - डॉक्टरांना जीव वाचवणारा परमेश्वराचा दूत मानले जाते.रुग्ण, नातेवाईक यांच्यातील सुसंवादामुळे अप्रिय घटना टाळता येतात. नगरमधील साई एशियन हॉस्पिटलने आरोग्य सेवा देतांना गोरगरीब रुग्णांना, सर्वसामान्यांना ज्या शासकीय आरोग्यदायी योजना आहेत, त्यांचा लाभ करुन द्यावा, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
तारकपूर येथील जे.एस.एन.अहमदनगर आरोग्य प्रायव्हेट लिमिटेड साई एशियन हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कॅथलॅबचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, बीड जिल्हा काँग्रेसच्या महिलाध्यक्षा मीनाक्षी पांडुळे, गोरेगांवचे माजी सरपंच नाना नरसाळे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
महापौर वाकळे पुढे म्हणाले, पुणे-मुंबई तसेच मोठ्या महानगराप्रमाणेच आता नगर शहरातील तारकपूर परिसर हे अद्यावत रुग्णालयांमुळे ओळखले जाऊ लागले. साई एशियनच्या सर्व डॉक्टरांनी सेवाभाव मनात ठेवून रुग्णसेवा द्यावी. जागतिक दर्जाच्या सुविधा येथे मिळणार असल्याने रुग्णांना फायदा होईल.
प्रास्तविकात हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितिन नागरगोजे यांनी हॉस्पिटलमध्ये किडनीच्या शस्त्रक्रिया, पॅरेलिसीस व मेंदूच्या उपचारांचे अत्याधुनिक केंद्र, सर्पदंश, विषबाधा वेगळा कक्ष, एचआयव्ही व कॅन्सरवर उपचार येथे केले जात असल्याचे सांगितले. डॉ. जगदीश चहाळ यांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये गुडघेरोपण शस्त्रक्रिया, मणक्याची लेझर शस्त्रक्रिया, दुर्बिणीच्या सहाय्याने सांध्यांच्या शस्त्रक्रिया अल्पदरात येथे केल्या जात असल्याने रुग्णांचा प्रतिसाद मिळतो.
डॉ.महेश जरे यांनी कॅथलॅब बद्दल सविस्तर माहिती देऊन हॉस्पिटलमधील रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोसर्जरी, युरोसर्जरी, बर्न व प्लॉस्टिक सर्जरी याबाबत माहिती दिली. डॉ. सचिन पांडूळे यांनी हे हॉस्पिटल 100 बेडचे असून, एमआयआर, सीटीस्कॅन, डायलिसीस व विविध विभागातील अत्याधुनिक मशिनरी विषयी सांगितले.
याप्रसंगी मीनाक्षी पांडूळे, नाना नरसाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पोपट धामणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी संपत पंडित यांनी मानले. कार्यक्रमास नगर शहरातील डॉक्टर, मेडिकल, एमआर, लॅब, आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment