Wednesday, 27 February 2019

राष्ट्रवादीचा शहर जिल्हाध्यक्ष लोकसभेनंतर ठरणार


नगर । प्रतिनिधी - महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी लपविल्याने त्यांना पदावरून पायउतार केलेले आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच विधाते यांना नोटीस काढलेली होती. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त असून त्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. मात्र, आज जर एखाद्या व्यक्तीला या पदावर बसविले तर नाराजी वाढू शकते त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे लोकसभेनंतरच या पदाची निवड होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. आता राष्ट्रवादीचा शहर जिल्हाध्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीनंतरच ठरणार आहे. 
आमदार अरूण जगताप व संग्राम जगताप यांचे अत्यंत विश्वासू म्हणून माणिक विधाते यांना शहर जिल्हाध्यक्षपद दिले होते. आ.जगताप यांनीच त्यांना या पदावर बसविले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षसंघटनेचे उत्तम काम केले. मनपा निवडणुकीतही त्यांची कामगिरी चांगली राहिली. परंतु महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मनपात भाजपने सत्ता मिळविली. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा नकार दिलेला असतानाही हा पाठिंबा कसा दिला? असा सवाल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरातील स्थानिक नेतृत्व व शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांना विचारला. पक्षसंघटना या नात्याने शहरजिल्हाध्यक्ष विधाते यांनी वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली नाही. असा ठपका विधातेंवर ठेवण्यात आला. माहिती लपविली व पक्षाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. निवडणुकीनंतर पंधरा दिवसातच हा निर्णय घेण्यात आला. दीड महिन्यापासून हे पद रिक्त आहे. लोकसभेच्या तोंडावर तातडीने या पदावर नव्या व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी शहरातील अनेकांनी वरिष्ठांकडे फेल्डिंग लावली. तीन लोकांच्या शिफारशीही वरिष्ठांकडे गेल्या आहेत. इच्छुकांची संख्या वाढली असल्याने लोकसभेच्या तोंडावर निवड केल्यास नाराजी वाढू शकते. त्यामुळे ही निवडणूक थेट लोकसभा संपल्यानंतरच घेण्यात येईल. असे संबंधीत इच्छुकांना सांगण्यात आले. प्रदेश पातळीवरच हा निर्णय झाला आहे. त्यामुळे शहरजिल्हाध्यक्ष या पदासाठी बांशिंग बांधून बसलेल्यांनी आता लोकसभेत चांगले काम करून दाखवा असेही सुनावले. लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्यास तुमचा शहरजिल्हाध्यक्ष पदासाठी विचार करू असेही वरिष्ठांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment