Wednesday, 27 February 2019

शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीला येणार वेग


नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या विद्युत विभागासाठी इलेक्ट्रीक सीडी असलेली 2 हायड्रोलिक वाहने दाखल झाली असून त्यामुळे विद्युत विभागामार्फत करण्यात येणार्‍या विविध कामांबरोबरच नगर शहरातील व उपनगरातील नादुरुस्त होवून बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 
महापालिकेने विद्युत विभागासाठी 2 अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने खरेदी केले असून त्याचे पूजन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) दुपारी करण्यात आले. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त प्रदीप पठारे, यंत्र अभियंता परिमल निकम, नगरसेविका लता शेळके, अजय चितळे, विलास ताठे, मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, कॅफो प्रवीण मानकर, अमोल लगड, संजय ढोणे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रत्येकी सुमारे 18 लाख रुपये किमतीची ही दोन्ही वाहने असून ती गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपनीकडून बनवून घेतलेली आहे. या वाहनावरील  इलेक्ट्रीक सीडी या 13 मीटर (40 फूट) उंचीपर्यंत जाऊ शकतात, तसेच सुमारे साडेचार मीटर वर्तुळाकार काम करू शकतात. या सीडीच्या ट्रॉली मध्ये 2 कर्मचारी उभे राहून काम करू शकतात. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयी सुविधायुक्त ही वाहने आहेत. 
त्यामुळे आता विद्युत विभागातील विविध कामे, पथदिव्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वेगात होणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment