Tuesday, 19 February 2019

शिवरायांचा जयघोष!







नगर । प्रतिनिधी- भगवे झेंडे, भगवे फेटे अन् मुखी शिवरायांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज  शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. े
तारखेप्रमाणे साजर्‍या होणार्‍या शिवजयंती उत्सवाने संपूर्ण नगर शहर भगवेमय झाले. जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने उत्साहात अधिकच भर घातली.
बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महपौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा हस्ते विधीवत पूजन करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवपुतळ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी छत्रपती महाराज यांची वेषभूषा परिधान केली होती. तर मिरवणुकीच्या पुढे विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते. मिरवणुकीत महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर ढवण यांच्यासह महापालिका, महसूलचे अधिकारी, नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. महिला-युवतींचा लक्षणीय सहभाग होता.
माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळेरोड, दिल्लीगेट मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. बालगोपाळांसाठी खाऊची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. माळीवाड्यासह विविध ठिकाणी मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती उभारली होती. दिल्लीगेट येथे आकर्षकसजावट करण्यात आली होती. तसेच शहरातील विविध चौका-चौकात भगवे झेंडे लावल्यामुळे शहर भगवेमय झाले होते.
नगर शहराप्रमाणेच उपगनरातही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड येथील बागडपट्टीचा राजा, श्रीराम चौकताही भव्य देखावे उभारण्यात आले होते.

No comments:

Post a Comment