Thursday, 28 February 2019

..तर ग्रामसेवकांचे 10 मार्चपासून असहकार आंदोलन


नगर । प्रतिनिधी - नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक शासकीय योजनांची गावपातळीवर अतिशय प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. ग्रामसेवकांच्या प्रयत्नातूनच जिल्हा अनेक योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर झालेला आहे. असे असताना प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर चुकीच्या पध्दतीने निलंबनाच्या कारवाया होत आहेत. असे प्रकार अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत होत असून सर्व संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन तातडीने रद्द करून त्यांना पुनर्स्थापित करावे, अन्यथा दि.10 मार्चपासून जिल्हाभर असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिला आहे.
ग्रामसेवकांवर होणार्‍या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामसेवकांची एकत्र बैठक घेतली. यानंतर ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, कुंडलिक भगत, किशोर जेजूरकर, एकनाथ आंधळे, शहाजी नरसाळे, राजेंद्र मेहेत्रे, सुरेश मंडलिक, दिलीप नागरगोजे, संपत दातीर, सुनिल नागरे, बाळासाहेब आंबरे, रमेश बांगर, सुनील वाघ, भैरया कोतुळे आदी उपस्थित होते.
प्रशासनाने नुकतीच पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती तसेच नगर तालुक्यातील इमामपूर येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय अन्य अनेक ग्रामसेवकांवरही अशा कारवाया झालेल्या आहेत. अनेक प्रकरणात कोणतीही खातरजमा न करता निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अतिशय चुकीच्या पध्दतीने होत असल्याने ग्रामसेवक संवर्गात नाराजी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वच संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन रद्द करावे, 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या ग्रामसेवकांना तात्काळ सेवेत समावून घ्यावे, आश्वासित प्रगती योजनेचे आदेश तात्काळ मिळावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment