Thursday, 14 February 2019

जलपूरक शहरीकरणावर भर देणे गरजेचे ः आर्किटेक्ट रोहित साळुंके


नगर । प्रतिनिधी - पूर्वीची बहुतांश शहरे ही नदीच्या काठी वसलेली होती. तसेच शहराचे अर्थकारण हे उपलब्ध पाणीसाठा व जलस्रोत यावर अवलंबून होते. या जलस्रोताकडे दुर्लक्ष केल्याने शहर विकासावर आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाचा विचार करताना जलपुरक शहरीकरणावर भर देणे गरजेचे असल्याचे मत आश्वस्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंके यांनी व्यक्त केले.
आर्किटेक्ट इंजिनियर अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील मेघनंद लॉन येथे सीना नदी सुशोभीकरणाच्या दृष्टीने विचारमंथन आणि जलपुरक शहरीकरण या विषयावर आश्वस्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंके, सौ. सोनू साळुंके आणि योगिता कासवा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आर्किटेक्ट इंजिनियर अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सातकर, उपाध्यक्ष अनिल मुरकुटे, सचिव सलिम शेख, अशोक काळे, प्रदीप तांदळे, विजय पादीर, संजय पवार, अनिल धोकरीया, प्रशांत आढाव, अशोक मवाळ, दीपक मुथा, इक्बाल सय्यद, कैलास ढोरे, संतोष पळसकर, एस. यु. खान, अनिल साळुंखे, शेखर आंधळे, विनायक मैड, सुरेंद्र धर्माधिकारी यांच्यासह शहरातील नामांकित आर्किटेक्ट, इंजिनियर, सर्व्हेअर्स, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित साळुंके पुढे म्हणाले की, नदीचे सुशोभिकरण म्हणजे फक्त नदीकाठी फुलझाडे लावून देखावा करणे नव्हे, तर नदीत सोडले जाणारे मलमुत्रादी पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडणे आवश्यक आहे. जेणेकरून नदीचे पाणी दुषित होणार नाही. सध्याच्या काळात शहरांजवळून वाहणार्‍या नद्या या शहरातील मलमूत्र शहराबाहेर वाहून नेण्याचा स्रोत बनल्या आहेत. त्याचे अतिशय घातक परिणाम शहराच्या विकासावर आणि मानवी आरोग्यावर होत आहेत. याबाबत व्यवस्थित नियोजन केल्यास शहर विकासाची दिशा जलपूरक शहरीकरणाने नक्कीच बदलू शकते, असेही आर्किटेक्ट रोहित साळुंके म्हणाले.
यावेळी आर्किटेक्ट सोनू साळुंके यांनी भारतातील विविध नद्यांचे जल शुद्धीकरण व त्यामुळे शहरांचा झालेला विकास यावर विस्तृत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष अशोक सातकर, सचिव सलिम शेख यांनी संस्थेच्या वतीने सामाजिक गरज ओळखून नगर शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य ती तांत्रिक मदत देण्याची ग्वाही दिली.
अशोक काळे म्हणाले, 32 वर्षापूर्वी या संघटनेचे छोटेसे रोपटे लावले होते. आता त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर झालेले आहे. संस्थेचे सुमारे 450 सभासद असून ते सर्व एकत्रितपणे काम करत आहेत. त्यामुळेच ही संस्था नावारूपाला आली आहे.
सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले, तर सलीम शेख यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment