नगर । प्रतिनिधी- जिल्हाधिकार्यांचा आदेश धाब्यावर बसवून सावेडी तलाठी कार्यालयाकडून जनतेची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींना तलाठ्याकडून ‘सेटलमेंट’ करून सोयीस्कर कर आकारणी केली जात असून, त्यामुळे आधीच वादात असलेल्या महसूल विभागाचा अंदाधुंद कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने कर आकारणीसंदर्भात दर निश्चित केलेले असून, त्याची प्रतही तलाठी कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये रहिवाशांसाठी 72 पैसे चौ.मी., उद्योजकांसाठी 1.84 चौ.मी., वाणिज्यसाठी 2.16 चौ.मी. दर देण्यात आले आहे. मात्र, नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करुन रहिवाशांसाठी 2.81 चौ.मी., उद्योजकांसाठी 4.33, व वाणिज्यसाठी 4.33 याप्रमाणे दर आकरला जात आहे.
मनमानी कारभार करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असून, गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयात सर्रासपणे हा प्रकार सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनुसार माहिती घेतली असता ‘अहमदनगर घडमोडी’ला यासंदर्भातील आदेशाची प्रत मिळाली. त्यानुसार कर आकारणीचा हा आदेश सन 2011मधील असून, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून गेल्या आठ वर्षांपासून सावेडी कार्यालयात वाढीव दर लावून नागरिकांची लूट होत असल्याचे पुढे आले आहे.
No comments:
Post a Comment