Thursday, 28 February 2019

लिका प्राईडमध्ये अत्याधुनिक रसाळ नेत्रालयाचे शानदार समारंभात उद्घाटन


नगर । प्रतिनिधी - ज्या सिंधूताईला तुम्ही जगाची आई म्हणता तिने कधीकाळी नगरमध्येच रेल्वेस्टेशनवर अक्षरश: भीक मागितली आहे. आपल्याकडे नवर्‍याचे काम नेहमीच दिसते. बायकोचे कष्ट दिसत नाहीत. तिला मान देण्याचे काम डॉ.प्रकाश रसाळ यांनी केले हे कौतुकास्पद आहे. आईचे संस्कार व शिकवण अंगीकारत रसाळ परिवारातील प्रत्येक जण उच्चशिक्षित झाला. स्वत:बरोबर कुटुुंबाचा उत्कर्ष साधताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक भावनेतून रूग्णसेवेची परंपरा त्यांनी यापुढेही कायम ठेवावी, असे मनोगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
नेत्ररूग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत नगरमध्ये लालटाकी येथील कालिका प्राईड बिल्डिंगमध्ये नवीन सुसज्ज असे रसाळ नेत्रालय सुरू झाले आहे. सोमवारी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते या नेत्रालयाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे,  ज्येष्ठ सेनानी साहेबराव थोरवे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. बाळ बोठे, डॉ.सुंदर गोरे, डॉ.रमेश मूर्ती, हेमंतकुमार पोखरणा, डॉ.लक्ष्मीकांत किनगांवकर, डॉ.प्रा.ज्ञानदेव म्हस्के, रसाळ नेत्रालयाचे संचालक डॉ.प्रकाश रसाळ, कार्यकारी संचालिका अमृता रसाळ, मंगल रसाळ, प्रा.मंगेश रसाळ, डॉ.योगेश रसाळ, रोहिणी रसाळ, मनीषा रसाळ आदी उपस्थित होते. 
यावेळी रसाळ परिवारातर्फे सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यासाठी मदतीचा हात देण्यात आला. शुभारंभानिमित्त खा.दिलीप गांधी, देवीदास धस (आबा), अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या छायाताई फिरोदिया, डॉ.अभिजीत पाठक, डॉ.अशोक देशपांडे आदींनी रसाळ नेत्रालयास भेट देत शुभेच्छा दिल्या.
डॉ.प्रकाश रसाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिक्षण घेतानाच ठरवले होते की या क्षेत्रात भव्यदिव्य योगदान द्यायचे. जे द्यायचे ते इतरांच्या चांगल्यासाठी द्यायचे. सर्वांगसुंदर नेत्रालयाचे स्वप्न आज साकार होत आहे. नेत्रालयात मोतिबिंदू उपचारांसाठी स्वतंत्र विभाग असून याठिकाणी विनापट्टी, विनाभूल अत्याधुनिक (फेको) तंत्रज्ञानाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय मल्टीफोकल, टोरिक, फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध आहेत. ए स्कॅन तपासणीची विशेष सुविधा, कॉर्निया विभागात तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, काचबिंदू विभागात तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, ऑक्युलोप्लास्टी विभागात उपचार, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया, रेटिना तपासणी व मार्गदर्शन, मधुमेह नेत्रतपासणी व उपचार, डोळ्यांच्या अपघातासंबंधी परिणामकारक उपचार, कॉन्टॅक्ट लेन्सेस, कॉम्प्युटराईज्ड नेत्रतपासणी, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार आदी सुविधा आहेत.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहरात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. यातील रसाळ नेत्रालय हे नेत्ररुग्णांसाठी अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो.
डॉ. बोठे म्हणाले की, रूग्णांच्या सोयींचा बारीकसारीक विचार करून डॉ. रसाळ यांनी रुग्णालयाची उत्तम रचना केली आहे. सर्जरी व उपचारांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. उपचारांबरोबरच आपुलकीचा संवाद साधून ते रूग्णांना आपलेसे करतात. कडा येथेही त्यांचे सुसज्ज नेत्रालय आहे. 
अमृता रसाळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment