नगर । प्रतिनिधी - राज्यात खरीप हंगाम सन 2018-2019 मध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात तातडीने एका गावात एक छावणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु नगर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जास्त असून जनावरांची संख्याही मोठी आहे. एका गावात 500 पेक्षा जास्त जनावरे असल्यास त्याच गावात दुसरी छावणी सुरू करण्याची मागणी नगर दक्षिणमधील शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. या आंदोलनात शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने दिलेल्या निवेदनाचा आधार घेत आज महसूल विभागाने एका गावात दोन छावण्या सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासंदर्भातील आदेशही जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याची गरज असल्याची जिल्हाधिकार्यांना खात्री पटल्यास एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे.
एका गावात चारा छावणी उघडल्यानंतर त्या चारा छावणीतील जनावरांची संख्या कमाल 500 पर्यंत पोचल्यास त्याच गावामध्ये दुसरी छावणी उघडण्यास परवानगी मिळणार आहे. याच मागणीसाठी नगर जिल्हा शिवसेनेच्यावतीने नगर जिल्हाधिकारी यांच्या दारात आंदोलन केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले होते. नगर जिल्ह्यातील जनावरांची संख्या पाहता एका गावात दोन छावण्यांची परवानगी महसूल विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment