Monday, 25 February 2019

अहमदनगरच्या भूमीतील सर्वधर्मीयांचे अवतार मेहेरबाबा


नगर । प्रतिनिधी - अवतार मेहेरबाबांचा 125 वा जन्मोत्सव  मोठ्या उत्साहात रोज विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. मेहरबाबा जगात फिरले पण त्यांनी अहमदनगरची भूमी निवडली व येथेच स्थिरावले. ते नगरजवळील वांबोरी रोडवरील पिंपळगाव माळवी येथील आश्रमात राहत असत, तर त्याची समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे या ठिकाणी सतत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी व शांतीसाठी राज्यातून, भारतातून व जगातून येत असतात. 
मेहेरबाबांच्या अध्यात्मिक  कार्याविषयी माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर व विश्वस्त, नगर सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी म्हणाले की, नगर जिल्हा संतांचा जिल्हा आहे. या ठिकाणी अनेक अवतारी पुरुष, साधुसंत होऊन गेलेले आहेत. ज्यांनी सर्व धर्म एकच आहे हा संदेश दिला. असेच अवतार मेहेरबाबा अहमदनगरमध्ये होतेे. त्यांचे असंख्य भक्त आज भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा आहेत. तसेच असंख्य आश्रमही आहेत. अवतार मेहेरबाबा सर्व धर्मांवर प्रेम, सर्व धर्मांची पूजा करीत, परंतु आपण कोणत्याच धर्माचे नाही किंवा कोणता नवीन धर्म स्थापन करुन मानवाला मानवापासून वेगळे करुन त्यांच्यात भ्रम वाढवू इच्छित नाही असे मेहेरबाबा म्हणत.
 मेहेरबाबांचा जन्म पुणे येथे 25 फेब्रुवारी 1894 रोजी झाला. कॉलेजनंतर ते अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले. शिर्डीचे साईबाबा, शिर्डीजवळील साकुरीचे उपासनी महाराज, पुण्याचे हजरत बाबाजान, नागपूरचे ताजुद्दीन बाबा, दौंडजवळील केडगांव बेटचे नारायण महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. सर्व जातीधर्मातील लोकांना मानवतेचा संदेश देत पुढे त्यांनी जगभर प्रवास केला.
1923 साली बाबा अहमदनगरला प्रथम आले होते. त्यांच्या अरणगांव (मेहेराबाद) येथील कुटीवर सर्व धर्मांचे प्रतीक म्हणून सात रंगांचा ध्वज लावण्यात आला. याच ठिकाणी त्यांनी 1925ला धर्मार्थ दवाखाना व मोफत शाळा सुरु केली. बाबांनी 10 जुलै 1925 ते शेवटपर्यंत म्हणजे 31 जानेवारी 1969, असे 44 वर्षे मौनव्रत पाळले. या काळात ते कोणाशीच बोलले नाहीत. यातच त्यांनी भारतात अनेक ठिकाणी 13 वेळा अध्यात्म प्रचारासाठी जगप्रवास केला.
त्यांनी गॉडस् स्पिक, लिसन ह्युमिनिटी, परफेक्ट मास्तर, अवतार आदी ग्रंथ लिहिले. जगात कोठेही माझे निधन झाले तरी माझी समाधी अरणगांव (मेहेराबाद) येथेच बांधावी असे बाबांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते. हेच ठिकाण आता मेहेराबाद म्हणून प्रसिद्ध आहे. शेवटचा काळ त्यांनी पिंपळगांव माळवी (मेहेराझाद) येथे घालविला. तेथेच त्यांचे 31 जानेवारी 1969 रोजी महानिर्वाण झाले. नंतर त्यांची समाधी मेहेराबाद येथे बांधण्यात आली.
नगरमधील किंग्ज रोडवर अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे अवतार मेहेरबाबा केंद्र आहे. या ठिकाणाहून सर्व कारभार पाहिला जातो. येथेही विविध कार्यक्रम सादर होत असतात.  परदेशातही बाबांचे अनेक आश्रम आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, इराण आदी 30 देशांत 400 केंद्र असून भारतात अडीच हजार केंद्र आहेत. अमेरिकेत मरीन बिच येथे पाचशे एकर जागेवर, कॅलिफोर्निया येथे 100 एकर जागेवर मेहेर सेंटर आहे.
जगातील सर्व केंद्रात एकमेकांना जय मेहेरबाबा म्हणून ओळख दिली जाते. नगरमधील केंद्रात दर शनिवारी सायं.  बाबांच्या जीवनावर  प्रवचन व आरती होते. मेहेराबाद येथे  सकाळी व संध्याकाळी 7 वा. बाबांची आरती व भजन म्हटले जाते. आठवड्यातून एक दिवस धार्मिक कार्यक्रम, शनिवारी किंवा रविवारी धार्मिक फिल्म, प्ले, नाटक दाखविले जाते. 
प्रत्येक केंद्रात दरवर्षी विविध उत्सव साजरे केले जातात. यामध्ये 10 जुलै रोजी मौन सोहळा 24 तास पाळला जातो. 10 जुलै 1925 रोजी मेहेरबाबांनी मौनास प्रारंभ केला म्हणून हा उत्सव केला जातो. 16 ऑक्टोबर हा नवीन जीवन सोहळा म्हणून साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 1949 रोजी नवीन जीवन म्हणून बाबांनी दोन वर्षे पायी प्रवास केला. म्हणून बाबाप्रेमी नगर ते मेहेराबाद पायी दिंडी काढतात. 31 जानेवारी हा बाबांचा अमरतिथी सोहळा फक्त मेहेराबाद येथेच साजरा केला जातो. 13 जानेवारी 1969  या दिवशी बाबांचे महानिर्वाण झाले. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 
25 फेब्रुवारी हा बाबांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात प्रत्येक केंद्रात साजरा केला जातो. नगर केंद्रात आठ दिवस विविध कार्यक्रम सादर केले जातात. यात ध्वजारोहन, प्रार्थना, आरती, विविध भारतीय व परदेशी बाबाप्रेमींचे गायन-वादनाचे कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम होतात. राम, कृष्ण, बुद्ध, येशुख्रिस्त, महंमद पैगंबर यानंतर मेहेरबाबांचा अवतार आहे असे त्यांचे भक्तगण समजतात. त्यांचे भक्तगण सर्व धर्मांचे चिन्ह शुभ म्हणून वापरतात. ट्रस्टच्या बोधचिन्हावरही सर्व धर्मांची चिन्हे आहेत.
सर्वधर्मीय, परदेशात, देशात  प्रसिद्ध असलेल्या अवतार मेहेरबाबांची मेहेराबाद व मेहेराझाद या ठिकाण नगर शहराजवळ असून त्याठिकाणी एकदा तरी प्रत्येकाने पाहण्यासाठी व दर्शनासाठी आवर्जून जायला हवे.

No comments:

Post a Comment