नगर । प्रतिनिधी- बटाटेवडा, भजी विकणार्यांसाठी राज्यस्तरावर नवी नियमावली तयार करण्यात आली असून, वडा अथवा भजी दोनपेक्षा अधिकवेळा एकाच तेलामध्ये तळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने नुकताच हा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात अन्न औषध विभागाकडून त्याची तपासणी केल्यावर कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना आता दोनदाच तेलामध्ये पदार्थ तळता येणार आहे. त्यासंर्भात कोणीही अन्न आणि औषध विभागाकडे तक्रार केल्यास त्यावरुनही कारवाई होणार आहे.
हातगाड्यांवर अथवा हॉटेलमध्ये वडा, भजी विके्रत्यांकडून वारंवार एकाच तेलाच्या घाण्यामध्ये पदार्थ तळले जातात. त्यामुळे अनेकांना पोट व घशाचे त्रास होऊ लागतात. त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध विभागाची बैठक नुकतीच मुंबई येथे आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी 1 एपिलपासून होणार आहे.
नगरमध्ये शहराच्या विविध भागामध्ये हातगाड्या आणि हॉटेल्समध्ये वडे आणि भजी तळले जातात. परंतु विक्रेत्यांकडून कढईतील त्याच तेलामध्ये भजी आणि वडे वारंवार तळले जातात. आता अन्न आणि औषधच्या या निर्णयामुळे वारंवार एकाच तेलामध्ये भजी आणि वडे तळणार्यांना चाप बसणार आहे. घशाचे आणि पोटाचे विकार वाढल्यानेच शासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचेही समजते.
No comments:
Post a Comment