नगर । प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात वावरतांना आम्ही रोज अनेक चुका करत असतो. कायदे मोडत असतो व या सर्व बाबी आमच्याकडून कळत न कळत रोज सरास घडत आहे व त्या गोष्टींचा आम्हाला पश्चातापही नाही. पण याउलट जर आम्ही आमच्या सैनिकांचे जीवनमान बघितले तर आम्हाला जाणीव होईल की, ते कधीही देशाच्या कायदा मोडण्याचे धाडस करत नाही. आपल्याकडून काही चुकीचे घडू नये, ज्यामुळे साधारण माणसाचे किंवा देशाचे काही नुकसान होणार नाही याची ते फार काळजी घेतात. अशा या सैनिकांनी अनेक वेळा आपल्या परिवाराचा विचार न करता नेहमी देश व देशवासियांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे. देशवासियांनी त्याला कधीही विसरु नये, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.
अहमदनगर शहरातील अनेक हौशी गायक, वादक, कलाकारांनी मिळून जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना गोविंदपूरा येथे अॅड.अमिन धाराणी यांच्या लॉनमध्ये देशभक्ती गती संध्येने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गिटार वादक वृषाल एकबोटे यांनी शहीद झालेल्या परमवीरचक्र मिळालेल्या अनेक सैनिकांच्या स्वत: रंगवलेल्या फोटोंचे प्रदर्शन लावण्यात आले व मेणबत्त्या पेटवून गिटारवर ‘दिल दिया है जान भी देंगे.. ऐ वतन तेरे लिये’ हे गीत सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सुधा कांकरिया, अजय चितळे, नितीन शेलार, अॅड.गुलशन धाराणी, उद्योजक वसंत बोरा, प्रा.अपर्णा बालटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.अमीन धाराणी यांनी केले. मनोगत कलाशिक्षक प्रमोद रामदीन यांनी केले.
शौकत विराणी यांनी ‘जिंदगी मौत न बन जाये संभालो यारों.. ’ हे गीत सादर केले तर आशुतोष देवी, प्रा.अपर्णा बालटे, वसंत बोरा, समीर धाराणी, किरण वैकर, अनिल आंबेकर व सर्व गायकांनी मिळवून ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयो...’ हे गीत सादर करुन देशभक्ती गीत श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमास प्रफुल्ल गायकवाड, विवेक भारताल, प्रशांत वंडगर, मूर्तीकार गणेश गुडा, समाजसेवक भीमराज कोडम, राजू मंचे, आबीद खान आदी मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी साहिल धाराणी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment