नगर । प्रतिनिधी - केंद्र सरकारने जैन समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने जैन समाजात समाधानाचे वातावरण आहे. आता या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होवून समाजास अल्पसंख्याक म्हणून योजनांचे लाभ मिळायला हवे आहेत. यासाठी अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवताना येणार्या अडचणी दूर कराव्यात तसेच नगरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या जैन समाजाच्या संस्थांत्मक कार्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळावी अशी मागणी नगरसेविका सौ.मीनाताई संजय चोपडा यांनी केली आहे.
नगरसेविका मीनाताई चोपडा यांच्यासह जैन समाजाच्या शिष्टमंडळाने नगर दौर्यावर आलेले महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी शेख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संजय चोपडा, राजेंद्र गांधी, आशिष गांधी, डॉ.सचिन बोरा, राजेंद्र तातेड, अनिल दुग्गड, प्रितम पोखरणा, अतुल शेटिया, सुरेश मुनोत, अजय गुगळे, किरण पोखर्णा, संतोष भळगट, रवींद्र बाकलीवाल, नफीस चुडीवाला, संतोष गांधी (बापू), ब्रिजमोहन मालू, संतोष पारख आदींसह नगरमधील सुमारे 300 जैन समाजबांधवांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक दर्जाचे लाभ मिळण्यासाठी जैन बांधवांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासकीय कार्यालयात हेलपाटे मारुनही प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. ते त्वरित मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागास द्याव्यात. नगर जिल्ह्यात जैन समाजबांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. नगर शहराला तर मिनी राजस्थान म्हणूनही ओळखले जाते. नगरच्या विकासात या समाजाने मोठे योगदान दिले आहे. सर्वांसाठीच कार्य करण्यावर समाजाचा भर असल्याने समाजाच्या संस्थांना नगरमध्ये शासनाकडून कार्यालय, सांस्कृतिक भवनासाठी भूखंड मिळायला पाहिजे. त्यादृष्टीने अल्पसंख्याक आयोगाने योग्य शिफारस करावी. जैन समाजातील वंदनीय साधू साध्वीजी वैराग्य जीवनाचे पालन करीत देशभरात विहार करीत असतात. पायी भ्रमण करताना साधू-साध्वींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांना संरक्षणासह आवश्यक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment