नगर । प्रतिनिधी - विनाक्रमांकाच्या पावती पुस्तकाद्वारे कामकाज चालत असल्याने सावेडी तलाठी कार्यालयातील अनागोंदी समोर येत असून, त्यातून प्रशासकीय कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. कार्यालयातील ‘झिरो तलाठी’ ही बनावट पावती पुस्तके छापून त्याद्वारे कर आकारणीच्या पावत्या देतात. या पावत्यांचे कुठलेही ऑडिट होत नसल्याचा गैरफायदा घेत या माध्यमातूनही शासनाची फसवणूक केली जात आहे.
सावेडी तलाठी कार्यालयाच्या कारभाराचा ‘अहमदनगर घडामोडी’ने गेल्या चार दिवसांपासून पर्दाफाश केल्याने महसूल विभागात एकच चर्चेचा विषय झाला आहे.
सावेडी तलाठी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून झिरो तलाठ्यांमुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील झिरो तलाठी असलेल्या सुनीलच्या माध्यमातून बनावट पावती पुस्तके आणली जातात. त्या पावत्यांद्वारेच नागरिकांना कर आकारणीसंदर्भात पावत्या दिल्या जात आहेत.
मात्र, या पावत्या कोठून आणल्या जातात याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या पावत्यांवर कुठलाही सिरीअल नंबर नसल्याने नागरिकांकडूनही त्याचा आग्रह धरला जात नाही.
याचाच गैरफायदा घेतला जात आहे.
हरिषराव, तुम्हाला तर खुले आव्हान
वर्षानुवर्षांची थकीबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांनी अशा बड्या थकबाकीदारांकडून कर वसुली करावी. वर्षानुवर्षे थकबाकीदारांची यादी प्रसिध्द न करता त्यांच्याकडून केवळ मागील वर्षाची थकीत कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे हरिषराव तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांच्याकडून लगेच कर वसुली करुन दाखवावी.
एकच फंडा, पेन्सिल आणि खोडरबर
कर वसुली करताना झिरो तलाठ्यांकडून पेन्सिल आणि खोडरबरचा सर्रास वापर केला जातो. बड्या थकबाकीदारांना वसुली करताना पेन्सिलवर आकडेवारी मांडून नंतर त्यांचा सोयीस्कर भरणा केला जातो. ही सर्व प्रक्रिया झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून होत असताना सुनीलचे लक्ष मात्र मलिदा गोळा करण्यावरच असते.
त्या झिरोंची पाठराखण कशासाठी?
झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून अनागोंदी कारभार चालत असून त्यांची येथून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असताना प्रांत मॅडम यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी समिती नेमून कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.
No comments:
Post a Comment