Wednesday, 27 February 2019

गेल्या 5 टर्ममध्ये भाजप सरकारकडून विकास कामांना सर्वाधिक निधी मिळाला


नगर । प्रतिनिधी - विधानसभेत आमदार म्हणून काम करण्याची आपली ही पाचवी टर्म आहे. एक अपवाद वगळता 4 टर्म  सत्ताधारी पक्षाचा आमदार राहण्याचा योग आला. मात्र या पाच टर्ममध्ये विविध विकास कामांसाठी सर्वाधिक निधी सध्याच्या भाजप सरकारने दिला असल्याचे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील दरेवाडी येथे जलयुक्त शिवार अभियान, आमदार निधी, 25-15 योजना, दलित वस्ती सुधार योजना, 14 वा वित्त आयोग अशा विविध योजनांमधून सुमारे 3 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन आ.कर्डिले यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली झाले त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर  नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, रेवणनाथ चोभे, संचालक संदीप कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, संतोष म्हस्के, बाळासाहेब निमसे, अभिलाष घीगे, दिलीप भालसिंग, कानिफनाथ कासार, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन संभाजी पवार, संचालक छत्रपती बोरुडे, श्याम घोलप, दीपक कार्ले, अरणगावचे सरपंच मोहन गहिले, रभाजी सूळ, संजय धोत्रे, जयराम बेरड, माजी जि.प.सदस्या पूनम भिंगारदिवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आ.कर्डिले पुढे म्हणाले राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. खर्‍या अर्थाने हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नगर तालुक्याला आतापर्यंत सुमारे 90 कोटींचा निधी मिळाला आहे. लवकरच नगर, राहुरी व पाथर्डी तालुक्यासाठी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून बुद्धविहारांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार असून मागणी करणार्‍या गावांसाठी प्रत्येकी 25 लाखांचा निधी दिला जाणार आहे.
प्रा. भानुदास बेरड म्हणाले, भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. आजपर्यंत कोणत्याही सरकारला अशी कामगिरी करता आलेली नाही. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अनिल करांडे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment