नगर । प्रतिनिधी - नोकरी किंवा व्यावसायिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी, महिलांनी स्वतःचे संबंधित विषयाबाबतचे ज्ञान सतत वाढवत राहिले पाहिजे. काम किती वेळात पूर्ण होईल यापेक्षा कामाचा दर्जा सुधारण्यास लक्ष केंद्रीत करायला हवे. बदलत्या बँकिंग क्षेत्रात बँकेच्या कामकाजातील झालेल्या बदलांशी आनंदाने समरस होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या बेसिक कॅथोलिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजदिना कुटिन्हो यांनी केले.
जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे नागरी सहकारी बँकातील महिला संचालक व महिला कर्मचार्यांसाठी आयोजित ‘प्रशासन क्षमता कौशल्यवृद्धी ज्ञानसत्रा’चे उद्घाटन कुटिन्हो यांच्या हस्ते झाले. हॉटेल यश ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीच्या राष्ट्रीय महिला प्रमुख सुजाता खटावकर होत्या. यावेळी पुण्याच्या सामाजिक आरोग्य समुपदेशक व अभ्यासक डॉ. दीपलक्ष्मी पेशवे, औरंगाबादच्या देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ.मंजुषा कुलकर्णी, असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. गिरीश घैसास, उपाध्यक्ष नाथा राऊत, महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक्स असोसिएशनच्या संचालिका प्रा. मेधा काळे, संचालक अशोक कुरापाटी आदींसह राज्यभरातून नागरी सहकारी बँकांच्या महिला पदाधिकारी, संचालिका व महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
कुटिन्हो म्हणाल्या, दुसर्या बँकांच्या तुलनेत आपण कोठे आहोत हे जाणून घ्या. त्यात सुधारणा करण्याचा शोध घेवून ग्राहकोन्मुख बँकिंगशी जुळवून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. सुजाता खटावकर म्हणाल्या, कुटुंबातील बहुतांशी निर्णय महिलाच घेतात. हे हितकारक निर्णय सहमतीने व्हावेत यासाठी सर्वांची मनोभूमिका तयार करण्यात महिलांचा सिहांचा वाटा असतो. सामूहिक निर्णय क्षमता, एकाच वेळी विविध प्रकारचे कामे हाताळण्याचे कौशल्य, मानवसंसाधन, निधी गुंतवूणक, बचत वृत्ती या महिलांच्या गुण वैशिष्टयांचा ऊहापोह करून आत्मविश्वासाने व्यावसायिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दुपारच्या सत्रात डॉ. दीपलक्ष्मी पेशवे यांनी ‘महिलांचे आरोग्य व ताणतणाव, महिलांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय’ यावर मार्गदर्शन केले. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी ‘बँकिंग क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्याची महिलांची क्षमता-आव्हाने, संधी, प्रभावी व्यवस्थापनेद्वारे बँकिंग व्यवसायवृद्धी’ याबाबत विचार व्यक्त केले. सीए गिरीश घैसास यांनी जिल्ह्यातील महिलांच्या सहकार बँकिंग क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा व परंपरेचा गौरवपर उल्लेख करून असोसिएशनच्या वतीने राबवण्यात येणार्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला.
प्रास्ताविक प्रा. मेधा काळे यांनी केले. सूत्रसंचलन कार्यलक्षी संचालक अशोक कुरापाटी यांनी केले, तर उपाध्यक्ष नाथा राऊत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment