Tuesday, 26 February 2019

वकिली व्यवसाय करताना नीतीमूल्ये आणि आचारसंहिता पाळणे गरजेचे : न्या. साधना जाधव


नगर । प्रतिनिधी - वकिली हा एक पवित्र व्यवसाय असून, या व्यवसायातील तत्त्वे, आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जाणे अपेक्षित आहे. वकिली व्यवसायाची पत समाजात घसरू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्या. साधना जाधव यांनी केले. 
न्या. एस. बी. म्हसे पा. राज्यस्तरीय दोनदिवशीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सहसचिव अ‍ॅड. व्ही. डी. आठरे पा. होते. व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे पा., जिल्हा न्या. के. व्ही. बोरा, न्या. इटळकर, अ‍ॅड. माणिक मोरे, अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. माधवेश्वरी म्हसे, प्राचार्या राजेश्वरी म्हसे, जी. के. पाटील, प्राचार्य एम. एम. तांबे, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. शहाजी दिवटे आदी उपस्थित होते.
न्या. जाधव म्हणाल्या की, वकिली व्यवसाय करताना पुणे-मुंबईसारख्या महानगरव्यतिरिक्त  विचार करून सामान्यांपर्यंत न्याय कसा पोहोचला पाहिजे, याचे विविध दाखले देऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करणेही कर्तव्य भावना ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. एम. तांबे यांनी केले. स्वागतपर भाषणात अ‍ॅड. माणिक मोरे यांनी स्पर्धेचा आढावा घेऊन संस्था अशा स्पर्धांना सातत्याने प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. आठरे यांनी न्यायव्यवस्था ही एकमेव सर्वसामान्य लोकांसाठी आधारस्तंभ म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले. विधी शिक्षण आणि वकिली व्यवसायातून जनतेसाठी आपण काही तरी केले पाहिजे. ही भावना बळावते व त्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढत असल्याचे वेगवेगळे संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
स्पर्धेचा निकाल असा ः  प्रथम -  नवलमल फिरोदिया कॉलेज, पुणे (चषक व रोख 9 हजार रुपये), द्वितीय - भारती अभिमत विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, पुणे (चषक व रोख 7 हजार), उत्तेजनार्थ - शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, बेस्ट अ‍ॅडव्होकेट - तुषार शिंदे (शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे), बेस्ट मेमोरियल अ‍ॅवार्ड - भारतीय अभिमत विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, पुणे.

No comments:

Post a Comment