नगर । प्रतिनिधी - आजचा युवक हा मोबाईल आणि सोशल मीडियावरच अॅक्टीव्ह असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातून या युवकांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी या युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नाव कमावू शकतात. त्यांना विविध स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळ, सामाजिक दायित्व याकडे वळविणे गरजेचे आहे. कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे. या स्पर्धेत राज व शिवराज याने मिळविलेल्या यशामुळे नगरचे नाव राज्यपातळीवर चमकमविले आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. राज व शिवराज पुढील स्पर्धेत नगरचे नाव कुस्ती क्षेत्रात निश्चित उंचावतील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज संजय जाधव व शिवराज रावसाहेब कार्ले यांनी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नंदनवन उद्योग समुहाचे संजय जाधव, दत्ता जाधव, संजय वाल्हेकर, वैजिनाथ लोखंडे, चिकू सरोदे आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले, नगरमध्येही अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या खेळाने नगरचे नाव सर्वदूर पसरविले आहे. राज व शिवराज यांच्या राज्यस्तरीय यशामुळे ते पुढील स्पर्धाही चांगल्यापद्धतीने खेळून राष्ट्रीय स्तरावर चमकतील. या खेळाडूंना आमचे प्रोत्साहन राहील, असे सांगितले.
इंजिनिअर डिप्लोमा स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने पंढरपूर येथे या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज जाधव याने 61 किलो वजन गटात तर शिवराज कार्ले याने 85 किलो वजन गटात यशस्वी झुंज देत गोल्ड मिळविले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment