Saturday, 23 February 2019

पाच ‘झिरो तलाठी’ हाकतात सावेडी कार्यालयाचा कारभार...


नगर । प्रतिनिधी- सावेडी तलाठी कार्यालयात झिरो तलाठ्यांचेच राज्य चालत आहे. हरिषरावांनी हे पाचही ‘झिरो तलाठी’ पोसल्याने या कार्यालयात सातबार्‍यासह, नोटिसा, कर आकारणी, टपालमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. हरिषरावांच्या या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी वरिष्ठांना कारवाईचा बडगा उगारावाच लागेल हे निश्चित.
सावेडी तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर आवाज उठविल्यावर नगर शहरातील विविध भागातून ‘अहमदनगर घडामोडी’वर कौतुकाचा वर्षाव होत असून बेकायदा कारभार करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे असा सूर निघत आहेत. येथील तलाठी कार्यालयात एक नव्हे तर तब्बल पाचजण झिरो तलाठी म्हणून काम पाहत आहे. या सर्वांचा मुनीमजी म्हणून सुनीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याच्या हाताखाली अरविंद, दिलीप, गोविंद, आकाश हे आहेत. या सर्वांच्या माध्यमातून कर आकारणीसह अन्य कामे केली जातात. विशेष म्हणजे ही सर्व जबाबदारी ही हरिषरावांची असताना त्यांनी अनागोंदी कारभारातून मलिदा गोळा करून हे ‘झिरो तलाठी’ निर्माण केले आहेत. वास्तविक पाहता या झिरोंना पगार अथवा मानधन हे अनागोंदी कारभारातून मिळणार्‍या मलिद्यातून दिले जाते. अशा पध्दतीने कारभार चालवून हरिषरावांनी महसूल शाखेचे तीन तेरा वाजविले आहेत, असेच म्हणावे लागेल.

हरिषराव सरकारी काम करतात,
हे काय स्वतःच घर समजू नका
तलाठी कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या सातबार्‍यासह, शासकीय महसूल गोळा करण्याबरोबरच महत्त्वाच्या कामांसाठी ओळखले जाते. येथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे काम हे शासकीय नियमानुसार करावे लागते. मात्र, स्वतःची बडदास्त ठेवणार्‍यांना सोयीचे आणि सर्वसामान्य नागरिकांना सापत्न वागणूक देणे हे बरे नव्हे.


मलिदा देणार्‍यांच्या अपार्टमेंटच्या
नोंदी एक रात्रीत कशा?
अपार्टमेंटमधील फ्लॅटची नोंद करण्यास सर्वसामान्य व्यक्ती गेल्यास त्याला सध्या नोंदी बंद असल्याचे सांगण्यात येते. मात्र मलिदा देणार्‍या बड्या कॉन्ट्रॅक्टरच्या नोंदी मात्र एका रात्रीत कशा नोंदविल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


प्रांत मॅडम, सावेडी तलाठी कार्यालयात लक्ष घाला...
प्रांत मॅडम या कर्यालयावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे. मुळात येथील कार्यालयात एक नव्हे तब्बल 5 झिरो तलाठी म्हणून काम कसे काय करु शकतात? त्यांना पगार अथवा मानधन कोणत्या शासकीय कोट्यातून दिले जाते याचीही चौकशी केली पाहिजे. हरिषरावांची मुजोरी वाढून तब्बल पाच झिरो तयार करुन कामकाज केले जात असेल तर शासकीय तलाठ्यावर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. अन्यथा सेवाभावी संघटना रस्त्यावर उतरल्यास त्यांना आपण काय उत्तर देणार असाही सवाल उपस्थित होत आहे. यामुळे तलाठ्यावर कारवाई केलीच पाहिजे असाही सूर निघत आहे.

No comments:

Post a Comment