नगर/ प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात तसेच सोमवारी (दि.18) पुन्हा केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांना नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी पाकिस्तानचा झेंडा व दहशतवाद्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाही देण्यात आल्या.
बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या श्रद्धांजली सभेस सभापती विलासराव शिंदे, संचालक संदीप कर्डिले, रेवणनाथ चोभे, कानिफनाथ कासार, संतोष म्हस्के, राजेंद्र बोथरा, रावसाहेब साठे, उद्धव कांबळे, दिलीप भालसिंग, संतोष कुलट, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खर्से,बबन आव्हाड, जगन्नाथ मगर, सचिव अभय भिसे, निरीक्षक संजय काळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत बोलताना सभापती विलासराव शिंदे म्हणाले, या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनी देशातील कोट्यवधी जनतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या जवानांचे हौतात्म्य भारतीय जनता कधीही विसरू शकत नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली.
संचालक संदीप कर्डिले म्हणाले, आपल्या वीर जवानांनी काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवला आहे. मात्र तरीही पाकिस्तान भारतामधील अतिरेकी कारवाया थांबवत नाही. त्यामुळे आता अंतिम चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. या दहशतवादी हल्ल्याला केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली. यावेळी उपस्थित सर्वांनीच बदला घ्या, बदला घ्या, पाकिस्तानला धडा शिकवाच्या जोरदार घोषणा दिल्या.
No comments:
Post a Comment