नगर । प्रतिनिधी - ध्येय नसलेले आयुष्य निरर्थक आहे. जीवनात ध्येय ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी जिद्द व चिकाटी अंगीकारल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धामय युगातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोवर चौफेर ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नवीन ज्ञान आत्मसात करण्याची आवड असली पाहिजे. कष्ट व एकाग्रतेने ज्ञान आत्मसात होत असते. फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनण्याचे आवाहन सीए विजय मर्दा यांनी केले.
सारसनगर येथील कै.दामोधर विधाते प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या दहावी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मर्दा बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस शिवाजी विधाते, विद्यालयाचे मुख्यध्यापक शिवाजी म्हस्के, शोभा गाडगे, संतोष सुसे, सविता सोनवणे, गिते मॅडम, सचिन बर्डे, लता म्हस्के, विजय जावळे, भाऊसाहेब पुंड, योगेश दरवडे, राधाकिसन क्षीरसागर, वैष्णवी रेखी, साबळे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे मर्दा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवावी. दहावी ही यशाची पहिली पायरी असून, ही एक संधी आहे. गेलेली वेळ परत येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यास करण्याचे सांगितले.
शिवाजी विधाते म्हणाले की, शाळेला गुणवत्तेची उज्वल परंपरा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत शिकत असले तरी ज्ञानाने सर्व विद्यार्थी श्रीमंत आहे. यासाठी सर्व अध्यापक वर्ग कष्ट घेत असून, दहावीचे विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शाळेने दिलेले संस्कार व ज्ञानाची उतराई होणार नसून, ज्या शाळेत लहानाचे मोठे झालो, त्या शाळेपासून दुरावणार असल्याचे दु:ख व्यक्त केले. तर दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी जमवलेल्या पैश्यातून शाळेच्या डिजीटल क्लासरुमसाठी एलईडी टीव्ही भेट दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेहेत्रे यांनी केले. आभार सारिका गायकवाड यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment