Wednesday, 13 February 2019

तरूण देशोधडीला


नगर । प्रतिनिधी - या सरकारने तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून  बेरोजगारी हटविण्याचा शब्द दिला होता. परंतु साडेचार वर्षात देशात व राज्यात बेरोजगारीचा प्रश्न  भेडसावत असल्याने तरुणांमध्ये वैफल्यग्रस्तपता निर्माण झाली आहे. या सरकारने तरुणांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
शहर राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगारी प्रश्नी आज निषेध मोर्चा काढण्यात आला.  यावेळी अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, संग्राम जगताप, चंद्रशेखर घुले पाटील, नरेंद्र घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, अभिजीत खोसे, कपिल पवार, संजय कोळगे, माणिक विधाते, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, रेश्मा आठरे, मंजुषाताई गुंड, गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, फारुख रंगरेज, दीपक सूळ, सोमनाथ धूत, दत्ता गाडळकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सत्तेवर आल्यावर दोन कोटी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात बेरोजगारी वाढली आहे. तरूणांना रोजगार मिळाला नसल्याने तरूणांचा संताप वाढला आहे. दहशतवाद, काळ्यापैशांचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक म्हणून या नोटबंदीचे ढोल पिटले गेले. प्रत्यक्षात कंबरडे मोडले ते रोजगार निर्मिती करणार्‍या उद्योग-सेवा क्षेत्राचे. नोटबंदीनंतरच्या परिस्थितीतून देश सावरतोय न सावरतोय तोच चुकीच्या पध्दतीने लादलेल्या जीएसटीमुळे सर्वच उद्योग व्यवसायतही आलेली मंदी यामुळे रोजगारावर अधिक मोठा विपरीत परिणाम झाला. गृहनिर्माण क्षेत्राची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. त्यामुळे लघुउद्योगातील कामगारही देशोधडीला लागला आणि बेकारीच्या खाईत ढकलेले गेले. या बेरोजगारीमुळेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण क्षेत्रातही नोकर्‍या नसल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. 
आधीच वैफल्यग्रस्त असलेल्या  तरूणांना धर्माचा डोस पाजून त्याचा वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार या सरकारने सुरू केला आहे. देशात व राज्यात अधिकाधिक संधी तरूणांसाठी उपलब्ध झाल्या असत्या तर बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली नसती. साडेचार वर्षात पोकळ आश्वासनांचा भडीमार झाला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांकडून सरकारवर करण्यात आला.

No comments:

Post a Comment