नगर । प्रतिनिधी - नगर शहराजवळील के. के. रेंज परिसर आज, सोमवारी तोफगोळ्यांच्या व भेदक शस्त्रास्त्रांच्या मार्याने चांगलाच धडाडला. येथील मॅकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल (एमआयआरसी) सेंटरच्या वतीने युद्ध प्रात्यक्षिक व शस्त्रास्त्र प्रदर्शनाअंतर्गत हा सराव आज पार पडला. विविध अत्याधुनिक रणगाडे (टँक) व इन्फंट्री कॉम्बेट व्हेईकलने (आयसीव्हीसी) कर्णकर्कश आवाजात आपली घातक आणि लक्ष्यभेदी मारक क्षमता या माध्यमातून दाखवून दिली.
एमआयआरसीच्या कवचित कोर केंद्र एवम् स्कूलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रह्मण्यम् यांच्यासह लष्करातील विविध अधिकारी उपस्थित होते. या संस्थेत युद्धसैनिकांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच मित्रदेशांच्या सैनिकांनाही अत्याधुनिक युद्ध वाहनांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
आजच्या फायरिंगमध्ये घातक टी-90 टँक प्रमुख आकर्षण राहिला. सुमारे दोन तास चाललेल्या या युद्धसरावादरम्यान सुरुवातीला इन्फंट्री कॉम्बेट व्हेईकलने (आयसीव्हीसी) व हेलिकॉप्टर हल्ल्याच्या मारक क्षमतेचा परिचय करून देण्यात आला. नंतर शत्रूंच्या प्रतीकात्मक स्थानावर तोफगोळ्यांचा वेगाने घातक मारा करून ही स्थाने उद्ध्वस्त करण्यात आली.
संचनल दलाने शिस्तबद्ध व आवेशपूर्ण संचलन करून अत्याधुनिक रणगाडे व आयसीव्हीसीच्या क्षमतेचे उपस्थितांना दर्शन घडविले. तोफगोळ्यांच्या धडधडाटाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. प्रदर्शनानंतर उपस्थितांना रणगाडे, आयसीव्हीसी वाहन, विविध शस्त्रास्त्रे जवळून पाहण्याची संधी मिळाली. देशाच्या सामरिक बळाचा अनुभव घेता आल्याने प्रत्येकाला देशाप्रती गौरव व अभिमान दाटून आला.
No comments:
Post a Comment