नगर - जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना धोबीपछाड देत शून्यातून जिल्ह्यात व राज्यात राजकीय अस्तित्व निर्माण करणारे नगर-राहुरी मतदारसंघातील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना आगामी विधानसभेत पराभूत करण्यासाठी थेट बारामतीकरांनीच कंबर कसली आहे. त्याची प्रचिती काल, शुक्रवारी जेऊरच्या सभेत पाहावयास मिळाली. मतदारसंघातील नगर तालुका, पाथर्डीचे शिवसेना पदाधिकारी व राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकार्यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित बैठक घेतली. सर्वांनी एकजुटीने कर्डिलेंना पराभूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. नगर तालुका आणि पाथर्डीचे मतदारच कर्डिलेंना घरचा रस्ता दाखवू शकतात. सर्व सहकार्य मी करायला तयार आहे. राष्ट्रवादीची सर्व फौज तुमच्या पाठीशी करतो. फक्त भाजपचा आमदार घरी बसवा असा इशारा पवारांनी पदाधिकार्यांना बैठकीत दिला. त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पावलं उचलली असून नक्कीच बदल करण्याचे आश्वासन यावेळी पवारांना दिले. भल्याभल्यांना राजकारणात चेकमेट देणारे कर्डिले हरणार्यातले नसून त्यांनीही विकास कामांच्या उद्घाटनांचा जोर वाढविला आहे. निवडणूक जिंकण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. परंतु बारामतीकर ज्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करतात त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्डिले खिंडीत सापडणार, की खिंड भेदणार याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात झाली. काल शुक्रवारी रात्री 8 वाजता जेऊर (ता.नगर) मध्ये अर्थातच आ.शिवाजी कर्डिले यांच्या मतदारसंघात परिवर्तन यात्रेची सांगता सभा झाली. या सभेवेळी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व नगर तालुका राष्ट्रवादी, काँग्रेसह शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मोठी गर्दी जमवली होती. या सभेत भाजपशिवाय सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणातून कर्डिलेंना टार्गेट केले गेले तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचेही जगजाहीर बोलून दाखविले.
राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हा तरूण चेहरा असून त्याला सर्वांनी सहकार्य करण्याची सादही पवारांनी घातली. म्हणजे प्रत्यक्षरित्या तनपुरेच विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे जाहीर झाले. या सभेत तनपुरे यांनी दोन-अडीच हजार कार्यकर्ते राहुरीतून आणले होते. सभेत तनपुरेंनीही शक्तीप्रदर्शन केले. नगर तालुका व पाथर्डीतील शिवसैनिकही सभेला उपस्थित होते. यामुळे चार हजारांपर्यत सभेला गर्दी जमविण्यात तनपुरे यशस्वी ठरले. अन् सभा यशस्वीही करता आली. या सभेदरम्यान आ.कर्डिले यांना खूप जोर चढलाय तो कमी करावाच लागेल. तर तरूण चेहर्यासमोर म्हातारा माणूस टिकणार काय? तरूणाची रग वेगळीच असते, या भाजप आमदाराचे दिवस खूप कमी राहिले आहेत धमकी वजा इशारा आ.कर्डिलेंविरूद्ध राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. अजित पवार यांनी तर कर्डिलेंची दादागिरी संपवून टाकणार. आता जनता शांत बसणार नसून या मतदारसंघात परिवर्तन होणार आहे. दहशतीला संपविण्यासाठी तरूण चेहरा निवडणुक देण्याची जनतेला मागणी केली. काहीही अडचण आली तर राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका असेही पवारांनी सांगितले.
सभा संपल्यानंतर शिवसेनेचे गोविंद मोकाटे यांच्या घरी पवारांसह सर्वच माजी मंत्र्यांसाठी जेवनावळ होती. रात्री 12 वाजेपर्यंत मोकाटे यांच्या घरी पवार बसून होते. या दरम्यानच आघाडीसह शिवसेनेचे पदाधिकारी पवारांनी बोलावून घेतले. जवळपास महत्वाची 50 ते 60 पदाधिकार्यांना कर्डिलेंना पराभूत करण्याचे डाव सांगितले. जेऊर व पाथर्डीच्या गटात सेनेची मोठी ताकद आहे. येथूनच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरभरून मते दिल्यास विजय सोपा आहे. त्यादृष्टीने आजपासूनच कामाला लागण्याचे आदेश सर्वांना दिले. पदाधिकार्यांनी पवारांना शब्द दिला असून महाआघाडीच्या पदाधिकार्यांनी कर्डिलेंविरोधात दंड थोपटले असून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कर्डिले हे तळागळातील नेते आहेत. त्यांचा घरा-घरात जनसंपर्क आहे. चार वेळा आमदार आहेत. त्यांची कामे हाच त्यांचा विजय असतो. असे त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा नेहमीच दावा असतो. त्यात सत्य आहे हे विसरूनही चालणार नाही. नगर तालुक्याचे विभाजन झाल्याने राहुरीत कर्डिलेंची पाटी कोरी असताना त्यांनी विजयश्री खेचून आणला होता. आता तर त्यांनी दहा वर्षात राहुरीच्या पाटीवर विकासाचे आरखडे आखले आहेत. कधी नव्हेएवढा विकास दाखविला आहे. सरकार भाजपचे असो या आणखी कोणत्याही पक्षाचे कर्डिले हे निवडणुकीतनंतर पक्ष मानत नसून जनतेचे काम हाच त्यांचा पक्ष असतो. त्यामुळे त्यांनी पहिली निवडणुकी नियोजनाच्या व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जिंकली. त्यावेळेस ते अकरा हजार मतांने विजयी झाले होते. दुसर्या वेळेस तर त्यांचा एकतर्फी विजय झाला. आता तर दहा वर्षात कर्डिले हे घराघरात पोहचले असून त्यांची विकासकामे ही जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे त्यांना पराभूत करणे एवढं सोप राहिलेले नाही. नगर तालुक्यात कर्डिलेंना मानणारा वर्ग मोठा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीला नगर तालुक्यात कमी मतं मिळत असली तरी आमदाराकीला सर्वाधिक मते कर्डिलेंनाच मिळालेली आहेत. त्यामुळे तनपुरेंना नगरची जनता कितपत स्विकारील हाही तेवढाच चिंतनाचा विषय ठरेल. राहुरीतील जनतेसाठी आ.कर्डिले पूर्ण वेळ देतात. त्या तुलनेत तनपुरे मतदारसंघातील नगर व पाथर्डी गटासाठी वेळच देत नाहीत असे म्हटले तरी वागवे नाही. त्यामुळे सध्या तरी तनपुरे हे आ.कर्डिले यांचे विरोधक असणे हे थोडं हस्यास्पदच होत आहे. सध्या तरी आ.कर्डिलेंना सक्षम विरोधक नगर-राहुरीत तयार झाला नसून बारामतीकरांनी काही चमत्कार केलातच, तरच काहीतरी आशा अन्यथा राष्ट्रवादीला कर्डिलेंविरोधात निवडणुक सोपी नसल्याची आजची परिस्थिती आहे.
सेनेच्या मोकाटेंसाठी राष्ट्रवादी सरसावलीजेऊरच्या सभेत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी सेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला. त्या सेनेच्या सदस्या असल्या म्हणून काय झाले? भाजप सरकारने एका कमी वयातील मुलीवर मोक्का लावला ही देशातील एकमेव घटना आहे. दबाव टाकून केलेला हा प्रकार आहे. एक मुलगी गुन्हा करू शकते का? त्या बिचारीचा काय दोष? तरीसुध्दा तिला मुद्दामहून अडकविण्यात आले आहे. मोकाटेंच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी असल्याचे पवार यांनी सांगितले. सेनेच्या तिकिटावर जेऊर गटातून मोकाटे यांचा जिल्हा परिषद गटातून एकतर्फी विजय झाला होता. त्यांच्यामागे जनमत आहे. त्याचा फायदाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.
नगरची महाआघाडी तनपुरेंच्या पाठीशी राहील का?
नगर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आ.कर्डिलेंविरोधात महाआघाडी अशी पंधरा वर्षांपासून लढत होते. यामध्ये महाआघाडी वरचढ ठरते. परंतु स्थानिक निवडणुकीसाठी ज्या गट व गणातून महाआघाडीचे उमेदवार विजयी होतात. त्याच भागांमधून विधानसभेला आ.कर्डिले यांना भरभरून मते मिळतात. दोन पंचवार्षिकमध्ये तर कर्डिले यांना या नगर तालुक्यातून 90 टक्के मते मिळाल्यानेच त्यांचा विजय झाला. याचा अर्थ आपला नगर तालुक्याचा माणूस म्हणून कर्डिलेंकडेच महाआघाडीचेही मते शेवटच्या टप्प्यात जातात. मग पवारांनी मोट बांधली असली तरी नगरची महाआघाडी तनपुरेंचे काम करील का? हा सुध्दा चिंतनाचा विषय आहे.
No comments:
Post a Comment