नगर । प्रतिनिधी - चार वर्षापूर्वी मयत सुनील लांगोरे यांचे सेतू कार्यालय बंद केलेले असतानाही एक वर्षापासून अनधिकृतपणे तहसील कार्यालयासमोर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे सन 2014 रोजी या सेतू कार्यालयात अनागोंदी झाल्याने सील ठोकण्यात आले होते. तरीसुध्दा 2018 पासून हा सेतू सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नायब तहसीलदार यांच्याहस्ते याचे उद्घाटन झाले असून अनधिकृत सेतू चालविण्याचा प्रकार राजरोज सुरू असताना प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी मात्र याकडे डोळेझाक केली आहे. मयताच्या नावे हा शासकीय सेतू चालविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, नगर तहसील कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून मयत सुनील लांगोरे (सेतू आयडी. एमओएल8103481) यांचे गाळा नंबर.22 सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात सेतू सुरू होता. या सेतूच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तब्बल चार ते साडेचार हजार तक्रारी प्रांताधिकार्यांकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे लांगोरे यांच्याविरूध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तो सेतू कायमचा सील करण्यात आला होता. तत्कालीन प्रांत अधिकारी वामन कदम यांनी त्या सेतूला सील लावले होते. परंतु तांत्रिक बाबी शासकीय पातळीवर पूर्ण न झाल्याने या सेतूचा आयडी नंबर ऑनलाईन ब्लॉक करण्यात आला नाही. त्यामुळे तो सुरूच राहिला. कार्यालयाला सील ठोकले पण ऑनलाईन सेतू बंद करण्यात आलेला नव्हता. याचा फायदा घेत एका राजकीय व्यक्तीने शासकीय अधिकार्यांशी तडजोड करीत पुन्हा 2018 मध्ये धुमधडाक्यात या सेतूचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे या सेतूचे उद्घाटन नायब तहसीलदारांच्याच हस्ते झाले आहे. यावेळी अन्य प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. आता तो सेतू शासकीय प्रक्रियेनुसार सुरू असला तरी त्याची अधिकृत नोंद नाही. म्हणून हा सेतू अनधिकृत असतानाही सुरू आहे. मग त्यांच्याकडून देण्यात येणारी सर्व विविध स्वरूपांचे दाखले खरे आहेत की खोटे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठांसह तहसीलदारांनी का दुर्लक्ष केले? याची तहसील परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
No comments:
Post a Comment