नगर । प्रतिनिधी - गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक अविष्कार म्हणजे तमाशा. तमाशा हा महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. लहानपणापासूनच लावणीची आवड असल्याने पुरुष असूनही लावणी करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. भूमिका समजून अभिनय करण्यात खरा आनंद आहे, असे मत लावणीसम्राट व नृत्य दिग्दर्शक आशिमिक कामटे यांनी व्यक्त केले.
शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण झाले. या कार्यक्रमात कामटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सिताराम खिलारी, जयंत वाघ, अलकाताई जंगले, निमाताई काटे, मुकेश मुळे, मेघाताई काळे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य प्रा. मच्छिंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.
कामटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात एकतरी कला जोपासली पाहिजे. अभ्यासाबरोबरच आपणास ज्या कलेविषयी आवड आहे, ती जोपासली पाहिजे. त्यातून तुम्हाला आनंद तर मिळेलच परंतु त्याचबरोबरच त्या कलेत नैपुण्य मिळविल्यास करिअरही करता येऊ शकते. महाराष्ट्रातील पारंपारिक कला जोपासण्याची आज गरज आहे.
याप्रसंगी रा. ह. दरे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. जिद्द व चिकाटीने कोणतेही काम केल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असल्यास समाजामध्ये मान-सन्मान मिळतो. शिक्षणाचा उपयोग स्वत:चे जीवन समृद्ध करण्यासाठी करा. मेंदू ठासून पगारी, भाडेतत्वाने देणे बंद करा. माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा.
यावेळी आशिमिक कामटे व त्यांच्या सहकार्यांनी ‘रंग लावणीचे’ महाराष्ट्राची ओळख व अस्मिता असलेल्या लावणीचे विविधरंगी आविष्कार सादर केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संगीत विभागाने गण सादर केला. स्वागत प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. मच्छिंद्र म्हस्के यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. राजेंद्र जाधव यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. उध्दव उगले व प्रा. राजेंद्र जाधव यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. सुभाष ठुबे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment