नगर । प्रतिनिधी - भारतीय संस्कृती ही सण व उत्सवाने परिपूर्ण आहे. प्रत्येक सण व उत्सव महत्वपूर्ण संदेश घेऊन येतो. तसाच संक्रांतीचा सण तिळासारखा स्नेह व गुळाचा गोडवा घेऊन येतो. संक्रांती अर्थात सकारात्मक क्रांती व्हावी, या उद्देशाने महिलांना वाणही दिले जाते. त्यानुसार भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानने आज समाजाला सुविचाराचे वाण दिले आहे. हा सुविचार म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा हा विचार समाज मनामध्ये जागृत झाला तर घराघरातून स्त्री जन्माचे स्वागत होऊन मुलींची संख्या वाढेल. त्यातून समाजाची विस्कटलेली घडी व्यवस्थीत होईल. आज स्त्रीभ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे लग्नाला मुली मिळत नाहीत, अशी वास्तवता स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी मांडली.
कल्याण रस्त्यावरील गणेशनगर येथील भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, योग शिक्षक सुरेश पाटील, लक्ष्मणराव पोकळे, मनोज बनकर, शरद ठाणगे, गणेश शिंदे, पोपट रासकर, पोपट शेळके, वैशाली नळकांडे, सविता शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानच्या शिल्पा पोपट शेळके म्हणाल्या, या परिसरात भृंगमहाऋषी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात. महिला बचत गटांचा मेळावा, वृक्षारोपण, विविध सण उत्सवांमध्ये महिला उत्साहाने भाग घेत असतात. यावर्षी हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना वाणाबरोबरच सामाजिक संदेश देण्यासाठी डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक ज्योती पोपट रासकर यांनी केले. त्या म्हणाल्या, महिलांनीच महिलांच्या विकासात हातभार लावला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन आपली उन्नत्ती साधण्याची गरज आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त एकमेकींचे सुख-दु:ख वाटून घेण्याचा व महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका पुष्पा बोरुडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी भृंगमहाऋषी विकास प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव केला.
मुलींच्या जन्माचे स्वागत कन्याजन्म आनंद सोहळ्याने करण्याचा संकल्प करुन सामूहिक शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन पोपट शेळके यांनी केले. पोपट रासकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment