नगर । प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत संगीत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी माउली सभागृह, सावेडी येथे सोमवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी होत आहे. ही स्पर्धा नगरमध्ये प्रथमच होत असल्यामुळे नगरच्या सांस्कृतिक वर्तुळासाठी ती अभिमानाची बाब ठरली आहे.
नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात संगीत, साहित्य, नाट्याची उज्ज्वल परंपरा तशी पूर्वीपासूनच आहे. यासाठी पूर्वी अनेकांनी योगदान दिलेले आहे. विशेषतः स्व. गो.म. देवस्थळी, डॉ. श्रीराम रानडे, रघुनाथराव क्षीरसागर, ल. का. कुलकर्णी, रासोटे सर, मालशे सर, चंद्रकांत भोंजाळ, भारत ससाणे, विलास गिते, श्रीधर अंभोरे, प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, अनिल क्षीरसागर, अण्णासाहेब रानडे, नाथबुवा दीक्षित अशा अनेकांनी संगीत साहित्य व नाट्यांची उज्ज्वल परंपरा टिकून अधिकाधिक यशस्वी केलेली आहेत.
संगीत नाट्य क्षेत्रात रुस्तुम काका हाथीदारू यांना प्रति बालगंधर्व म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते, तर रावसाहेब दुधाडे यांना युवा गंधर्व म्हणून ओळखले जाते. संगीत नाट्य रंगभूमीवर बालगंधर्वांचा वारसा म्हणजे गंधर्व गायकी जोपासली ती स्व. तात्यासाहेब तांबोळी, वसंतराव पाठक, पंडितराव भावे, तात्या भावे, गावडे, वाबळे, उषाताई शास्त्री, आशाताई देशपांडे, बाबूराव जाधव, शुन्नूमियासय्यद असे अनेक रुस्तुम काका बालगंधर्वांची गाणी गात असत. त्यांना केडगाव देवीचे बापूकाका गुरव व तात्या भावे तबला-व्हायलीनची साथसंगत करत असत.
‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक अ.ए.सो.च्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी मोने कलामंदिरमध्ये 1969साली सादर केले होते. रघुनाथ केसकर, मु.स.जोशी, शिवा दीक्षित, मुळे सर, कालिंदी कुलकर्णी, कुमुदिनी करमरकर, ल.भ. कुलकर्णी आदींनी हा प्रयोग यशस्वी केला होता.
या स्पर्धा नगरच्या सर्व गायकांना व वादकांना मार्गदर्शक ठरणार आहेत. नाट्यसंगीत आशयानुसार कसे गायिले जाते, ऑर्गनची साथ कशी पोषक करावी तबल्याची भरगच्च साथ कशी असते अशा अनेक दृष्टिकोनातून ही फार मोठी संधी आहे. तसेच व्यावसायिक संगीत नाटके नगरला येत नसल्याने नगरच्या संगीत रसिकांनी अवश्य उपस्थित राहून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment