नगर । प्रतिनिधी - वारंवार निवेदने देऊनही महापालिकेकडून कचरा संकलनाचे नियोजन होत नसल्याने शहरात कचरा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कचरा संकलनाचा उडालेला बोजबारा व इतर समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पाठिंबा दिला म्हणजे काहीही खपवून घेणार नाही, असा इशारा आ.जगताप यांच्यासह हकालपट्टी झालेल्या सर्वच नगरसेवकांनी भाजपच्या महापौर, उपमहापौरांसह अधिकार्यांना दिला.
सकाळी 11 वाजल्यापासून या आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, कुमार वाकळे, माणिकराव विधाते, दीपक सूळ, विनीत पाऊलबुधे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, नीलेश बांगरे, अमित खामकर, साधनाताई बोरूडे, रेखा जरे यांसह मोठा जनसुमदाय आंदोलनात सहभागी झाला होता.
यावेळी जगताप म्हणाले की, अनेक वेळा निवेदने दिली तरीसुध्दा मनपाकडून कोणताही प्रतिसाद नाही. यावरून अधिकार्यांना प्रश्नांचे गांभीर्य किती आहे हे लक्षात येते. आम्ही पाठिंबा दिला म्हणजे काहीही खपवून घेणार नाही. विकासासाठी वर बसलेल्यांना पाठिंबा दिला आहे. विकास होत नसेल तर खुर्च्या मोडून त्यांच्या गळ्यात घालायला मागेपुढे पाहणार नाही. अधिकार्यांनी नीट वागावे. एकही अधिकारी संपर्कात नसतात. कामे नगरसेवक करतात अन् बिले अधिकारी काढतात.चांगले काम केले तर चांगला निरोप देऊ. लाखो रूपयांचे मटेरियल कुठे जाते? जनतेसाठी केव्हाही सर्जिकल स्टाईक करू असे बोलत आ.जगताप यांनी थेट भाजपच्या पदाधिकार्यांवरच हल्ला चढविला.
आंदोलना दरम्यान नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, आम्ही पाठींबा विकासाच्या मुद्द्यावर दिलेला आहे. त्यामुळे त्याचा कोणीच फायदा घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा. पक्षाने काढले असले तरी आम्ही पक्षाच्या व आमदार जगताप यांच्या पाठीशी कायम असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
दोन वर्षांपासून अधिकारी सुस्त, पूर्वीच्या सत्ताधार्यांच्या काळात विस्कळीतपणा होता. आताही तीच परिस्थिती असेल तर काय उपयोग झाला? आंदोलन करावे लागेल असे वाटत नव्हते. मात्र सध्याची परिस्थिती बघून पुन्हा पुन्हा आंदोलने करावी लागतील असे वाटत असल्याचे माणिक विधाते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
नगरसेवक अविनाश घुले म्हणाले की, केअरटेकर पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी नियुक्त करा, नाहीतर एकाही अधिकार्याला खुर्चीवर बसू देणार नाही. नगरसेवक विनीत पाऊलबुधे, कुमार वाकळे यांनीही अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला.
महिलांनाही आक्रमक पवित्रा घेत कचर्याचे योग्य नियोजन न केल्यास कार्यालयात घुसू. आम्हाला काहीच वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकार्यांना दिला.
No comments:
Post a Comment