Monday, 4 February 2019

कचरा रॅम्पला कडाडून विरोध


नगर । प्रतिनिधी - वारुळाचा मारुती येथील होत असलेल्या कचरा रॅम्पला नागरिकांनी कडाडून विरोध करीत आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष लांडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, वारूळाचा मारूती हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. येथे कचरा रॅम्प सुरू झाल्यास नागरिक व छोट्या मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या परिसरात दातरंगे मळा, बागरोजा हडको तसेच नगर शहराची ज्यांनी स्थापना केली अहमदशहा बादशहा यांचीही कबर त्याच परिसरात आहे. या भागात रॅम्प झाल्यावर रस्ता अरूंद असल्यामुळे कचर्‍याच्या गाड्यांची मोठी वाहतूक याच भागातून होईल. यामुळे शाळकरी मुले व नागरिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने येथे 500 ते 1 हजार घरांचा प्रकल्प राबवला आहे. कचरा रॅम्पऐवजी या भागाचा विकास होईल असे प्रकल्प व नागरिकांना मूलभूत सुविधा होतील असे प्रकल्प जेणेकरून आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतील ते आणावेत. माळीवाड्यातील कचरा रॅम्प हटवण्याची मागणी आहे. त्याला आमचा विरोध नाही, पण नालेगांव भागात कचरा रॅम्प प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. येत्या आठ दिवसात कचरा रॅम्प हलवण्याच्या निर्णयावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा कुठलीही पुर्व सुचना न देता नालेगांव ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, याची सर्वस्व जबाबदारी मनपा प्रशासनाची राहणार आहे. तातडीने रॅम्प दुसरीकडे हलविण्यात यावा असा इशारा त्या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment