नगर । प्रतिनिधी - प्रत्येक सण हा महत्वाचा व आपल्या कल्याणासाठीच असतो. तिळगुळाप्रमाणेच आपआपसातील स्नेह वाढावा, म्हणून संक्रांत हा सण एकत्र येण्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वांमध्ये ईश्वराचे वास्तव्य आहे. तसेच सर्वांच्या मुखावर दिवसातून एकदा सरस्वतीचे वास्तव्य असते. म्हणून सर्वांनी कायम गोड, शुभ व वाणी सांभाळून बोलावे. बहुभाषीय ब्राह्मण न्यासने वर्षभर विविध उपक्रम राबवून केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सनातन धर्मसेभेचे अध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न दत्तोपंत पाठक गुरुजी यांनी केले.
बहुभाषीय ब्राह्मण न्यासच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित स्नेहमेळावा, तिळगुळ वाटप व गुणीजणांचा सत्कार समारंभाचे आयोजन सावेडीतील मधुरंजनी सभागृहात करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन भगवान परशुरामांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने वेदमंत्रांच्या उच्चारात दत्तोपंत पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी देशाचे दिवंगत संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण न्यासचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. कुलकर्णी हे होते.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्य सरचिटणीस मधुसूदन मुळे, नाट्य व मालिका कलाकार देवीप्रसाद सोहनी, नगरसेवक भैय्या गंधे, ब्राह्मण न्यासचे उपाध्यक्ष प्रकाश वसगडेकर, महासचिव नरहर कोरडे, खजिनदार प्रकाश आपटे यांच्यासह विनोद देव, सर्वोत्तम क्षीरसागर, पुरुषोत्तम गांधी, शिवप्रसाद जोशी, मोरेश्वर मुळे, सुधीर पाठक, चंद्रशेखर देशपांडे, अनंत वैकर, रत्नाकर कुलकर्णी, जयंत देशपांडे, अॅड. उमेश नगरकर, प्रिया जानवे, माधुरी संत, पुष्पा चितांबर, शरयू बुलाख, रोहिणी पुंडलिक, अलका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यात जलतरणपटू व प्रशिक्षक मेघना कुलकर्णी, घनपाठाचे शिक्षण पूर्ण करणारे वेदशास्त्रसंपन्न प्रतीक मुळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक नगर जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बुलाख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील कात्रे व सौ. सोहनी यांनी केले. आदिनाथ जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात ब्राह्मण न्यास संचालित सौदामिनी मधुकर कात्रे बचत गटाची स्थापना करण्यात आली.
No comments:
Post a Comment