नगर । प्रतिनिधी - ग्रामपंचायत कर्मचार्यांचे तीन महिन्यापासून तर नऊ महिन्या पर्यंतचे ऑनलाईन पगार रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करण्यात आले. हलगीच्या निनादात ग्रामपंचायत कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.
पुर्व सुचना देऊन आंदोलन करण्यात आले असताना जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक आणखी संतापले होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजे पर्यंत आंदोलन चालू होते. शेवटी ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी दळवी यांनी ऑनलाईन थकित पगार दि.7 तारखे पर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
बुरुडगाव रोडवरील भाकपच्या कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात राज्य सह सचिव अॅड.कॉ.सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक मारुती सावंत, कार्याध्यक्ष संदीप आल्हाट, सुनिल शिंदे, योगा कानडे, राजेंद्र कोरडे, भाऊसाहेब गिरवले, संजय शेलार, दादासाहेब साळवे, राहुल पोळ, एकनाथ वखरे, महादेव ढगे, देविदास साळवे, अशोक गुंजाळ, शांताराम पारधे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
गेल्या वर्षापासून ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचार्यांसाठी ऑनलाईन पगार सुरु झाल्याने सर्व आनंदात होते. मात्र ऑनलाईन पगार होताना अनेक त्रुटी निर्माण होऊन त्यामध्ये दुरुस्त्या झाल्या. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार हे काम व्हावे असे ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश आहेत. मात्र जवळपास तीन ते नऊ महिने होऊन देखील ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत. ज्यांचे पगार जमा झाले, त्यांचे पगार कमी जास्त अदा करण्यात आले आहे. कर्मचार्यांचे पुर्ण पगार होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे कर्मचार्यांवर उमासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वास्तविक ग्रामसेवक, बिडीओ व जिल्हा परिषद यांनी समन्वय साधून दर महिन्याला 25 ते 31 तारखे पर्यंत कर्मचार्यांची माहिती डाटामध्ये भरुन पगारविषयक सर्व पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी कोणत्याही तालुक्यातून होताना दिसत नसल्याने, कर्मचार्यांचे वेळेवर पगार होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्यांचा 1 ते 10 तारखे पर्यंत दर महिन्याचा पगार जमा होणे आवश्यक आहे. ऑनलाईन पगाराबाबत पुर्तता होत नसल्याने कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर सर्व कर्मचार्यांचे ऑनलाईन कामकाज पुर्ण झालेले नसेल तर निदान ज्या कर्मचार्यांची पगारविषयक पूर्ण माहिती भरली गेली त्यांचे पगार रोखून न ठेवता अदा करावेत, थकित पगार तातडीने अदा करुन ग्रामपंचायत कर्मचार्यांचे ऑनलाईन पगार मिळावेत.
No comments:
Post a Comment