Wednesday, 6 February 2019

तंबाखुजन्य व्यसनांमुळे दातांचे विकार वाढले ः डॉ. सुदर्शन गोरे


नगर । प्रतिनिधी - तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने दातांचे व मुख कर्करोगाचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन व्यसन चालूच ठेवल्यास नक्कीच दातांचा किंवा मुख-कर्करोग होण्याचा धोका संभवतो. त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व दंतचिकित्सक डॉ. सुदर्शन गोरे यांनी केले.
गोरे डेंटल हॉस्पिटल, माळीवाडा व नगर डॉक्टर्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुख कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गोरे बोलत होेते.
याप्रसंगी सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल जाधव, सोसायटीचे पदाधिकारी स्त्रीरोग तज्ञ डॉ. शिवराज गुंजाळ, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. महेश कोकाटे, अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक दातरंगे, मधुमेह तज्ञ डॉ. भरत साळवे, रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित सांगळे, डॉ. अभिषेक शेळके उपस्थित होते.
डॉ. गोरे पुढे म्हणाले, तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने तोंड कमी उघडणे, गालावर लाल व पांढरे चट्टे येणे, तिखट खाताना गालांची जळ-जळ होणे, यासारखी पूर्व प्राथमिक लक्षणे, शरीर आपल्याला कर्करोग होण्यापूर्वी दाखवत असते. या कर्करोगांच्या पूर्व प्राथमिक लक्षणांवर इंजेक्शन थेरपीद्वारे किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करुन तोंड कमी उघडण्याचे प्रमाण वाढून तोंड पूर्वीसारखे उघडू शकते. रुग्णांनी ही लक्षणे दिसल्यास अथवा दाताला किंवा तोंडाला सूज आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन निदान केल्यास मुख कर्करोग होण्याचा धोका टाळू शकतो.तंबाखूजन्य पदार्थांवर धोक्याची सूचना असूनही त्याच्या सेवनाचे प्रमाण कमी होत नसल्याने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी उपाध्यक्ष डॉ. शिवराज गुंजाळ यांनी यावेळी केली. 
अनेकदा रेडिएशन थेरपी झालेल्या रुग्णांना होमिओपॅथी उपचार पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, असे होमिओपॅथिक तज्ञ डॉ. महेश कोकाटे यांनी सांगितले. डॉ. अमोल जाधव यांनी अशा प्रकारचे शिबिर राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. अभिषेक शेळके यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

No comments:

Post a Comment