नगर । प्रतिनिधी - एकदंत कॉलनीतील बहुसंख्य समाज हा पद्मशाली समाज असून हा समाज अतिशय प्रामाणिक, कष्टकरी, होतकरु व मेहनती आहे. गरिबीतून काम, शिक्षण पूर्ण करुन आज या समाजाची तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. गणेश जयंतीनिमित्त मंडळातर्फे राबविण्यात येणारा उपक्रम गरजूंसाठी उपयोगी ठरणारा आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत बेडेकर यांनी केले.
सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बेडेकर, इंजिनिअर सतीश पागा, सत्यम प्रिंटर्सचे साई सुरम, प्रमोद रामदिन, महावीर कॉस्मेटिक्सचे दिलीप बायड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या रक्तदान शिबिरात 111 युवकांनी रक्तदान केले. गणेश जयंती उत्सवाची सुरुवात मंदिरात दिलीप बायड व सौ. बायड यांच्या हस्ते आरती करुन करण्यात आली. या रक्तदान शिबिरात दातरंगे मळा परिसरातील नागरिकांसह नगर शहरातील युवकांनी सहभाग घेतला. यात 3 महिलांनीही रक्तदान केले. यावेळी 150 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. या शिबिराला आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले. यावेळी डॉ. निशाद शेख म्हणाल्या, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणालातरी जीवनदान देतो. प्रत्येकाने वर्षातून एकदा रक्तदान करावे. रक्त हे कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणीतरी रक्तदान करावेच लागते. युवकांनी रक्तदान चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही.
सूत्रसंचालन सुरेखा कोडम यांनी केले. विनोदा बेत्ती यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment