Monday, 11 February 2019

नोटबंदी, जीएसटीच्या क्रांतिकारी निर्णयाचा सर्वांना फायदा ः खा. गांधी


नगर । प्रतिनिधी - सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे हाच दृष्टीकोन असणार्‍या यंदाच्या अर्थसंकल्पाचे परिणाम देशात नव्हे तर जागतिक स्तरावर होणार आहेत. नोटबंदी, जीएसटीसारख्या धाडसी व क्रांतीकारी निर्णयाचे परिणाम व यंदाचा अर्थसंकल्प सर्व स्तरातील नागरिक, व्यापारी, उत्पादक यांना निश्चितच फायदेशीर असल्याचे मत खा. दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्प 2019 विषयी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, अधिकारी यांची मते सर्वसामान्य नागरिकांना कळावीत, या अर्थसंकल्पातील नव्या गोष्टी माहित व्हाव्यात, या उद्देशाने नगर सीए शाखेतर्फे अर्थसंकल्प 2019 या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचा शुभारंभ खा. गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासनातर्फे आपली भूमिका मांडताना ते बोलत होते.
याप्रसंगी जीएसटी करसहाय्यक आयुक्त एस. एम. लंके, आयकरतज्ञ सीए अजय मुथा, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, आडत बाजार व्यापारी असो. चे संचालक गोपाल मनियार, ब्राम्हण बिझनेस नेटवर्कचे निखील कुलकर्णी, सीए शाखा अध्यक्ष ज्ञानेश कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी खा. गांधी म्हणाले, शेतकरी व व्यापारी जगला तरच अर्थव्यवस्था टिकेल यात शंकाच नाही, त्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत सुरू करण्यात आली असून करप्रणालीत झालेल्या बदलांचे व्यापार्‍यांनी स्वागतच केले आहे.
सीए अजय मुथा म्हणाले, गेल्या पाच वर्षातील अर्थसंकल्पाचे परिणाम पाहता आयकर दात्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. कर भरण्याचे फायदे-तोटे आता सर्वसामान्य जनतेला कळत आहेत. आयकर सवलतींचा लाभ घेताना नियोजन महत्वाचे आहे. 40 हजार व्याजवरील कर सवलत ही ज्येष्ठ नागरीकांसाठी आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न रिबेटद्वारा करमुक्त असून योग्य नियोजन केले तर यापेक्षाही अधिक उत्पन्न करमुक्त होऊ शकते. आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया म्हणाले, पूर्वी विविध करांच्या कटकटीमुळे जास्तकरून सीए व अधिकार्‍यांवर अवलंबून रहावे लागत होते. जीएसटीमुळे आता करविषयीची भीती कमी झाली. निखील कुलकर्णी म्हणाले, स्टार्टअप व मेक इन इंडिया योजनांचे फायदे आता दिसत असून जॉब शोधणारे आता जॉब देणारे बनले आहेत. 
पाच लाख उत्पन्नचे आयकर धोरण, दुसरे घर घेताना मिळणारे फायदे, शेतकर्‍यांना मिळणारे फायदे व नवीन सामूहिक शेती धोरण, आर्थिक विषमता व नियोजन याविषयी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. प्रास्ताविक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी देशातील 25 सर्वोत्कृष्ट संसदपटूूत निवड झालेले खा. दिलीप गांधी यांचा सीए शाखेतर्फे माजी अध्यक्ष मिलिंद जांगडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सीए सुशील जैन, सीए सनीत मुथा, सीए संदीप देसरडा, सीए पवन दरक, आर. आर. बोरा, जवाहर मुथा, मेहेर, हेमंत लोहगावकर, प्राची देशपांडे यांच्यासह व्यापारी, सीए विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शतानंद कलेढोणकर यांनी केले. सीए किरण भंडारी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment