नगर । प्रतिनिधी - नगर शहराजवळील वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील शेतकरी नितीन सुरेश ढेपे (वय 19) यांना ट्रॅक्टरचे हप्ते थकले म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कालच्या (गुरुवार) दैनिक अहमदनगर घडामोडीच्या अंकात फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून शेतकर्याला मारहाण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची एमआयडीसी पोलिसांकडून तात्काळ दखल घेण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत नितीन ढेपे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, वडिलांनी सुमारे 8 महिन्यापूर्वी एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून ट्रॅक्टर घेतलेला आहे. गुरुवारी (दि. 7) सकाळी साडेदहा वा. ट्रॅक्टर (क्र. एमएच 16 बीझेड 3689) घरी जात असताना फोर्जिंग कॉलनीजवळ एका इसमाने ट्रॅक्टर थांबवला. तुमच्या ट्रॅक्टरचे हप्ते थकले आहेत. मी तुमचा ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे, असे तो इसम म्हणाला. त्यावर माझ्या वडिलांना येऊ द्या, असे नितीन ढेपे म्हणाले. त्याचा राग आल्याने ढेपे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना ढकलून दिले. या मारहाणीत ढेपे यांच्या पाठीला व छातीला मार लागला आहे, असे या जबाबात म्हटले आहे. ढेपे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या जबाबावरुन एमआयडीसी पोलिसांत भादंविक 323 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment