Friday, 1 February 2019

सत्ताधार्‍यांना सरकार चालविण्याची अक्कल नाही ः धनंजय मुंडे


नगर । प्रतिनिधी - अनेक खोटी आश्वासने देऊन भाजप सरकारने जनतेला आशेला लावले. मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीही पडले नाही. सरकार चालवायला अक्कल लागते. सत्ताधार्‍यांना ती नसल्यामुळेच असे घडते आहे, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
पारनेर येथे काल, गुरुवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा व युवा नेते नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश यानिमित्त आयोजित सभेत श्री. मुंडे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, दिलीप वळसे, आमदार वैभव पिचड, आमदार रोहीत जगताप, रोहीत पवार, सर्जेराव निमसे, अंकुश काकडे, अविनाश आदिक, पोपटराव गावडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उदय शेळके, सबाजी गायकवाड, दीपक पवार, अशोक सावंत, कपिल पवार, संदीप वर्पे, बाबाजी तरटे, उद्धव दुसुंगे, विक्रम कळमकर, प्रशांत गायकवाड, शंकर नगरे, सुदाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. मुंडे पुढे म्हणाले की, आमचा पक्ष शब्द पाळणारा असून, पारनेरला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, भाजप सरकारच्या पापात शिवसेनेचाही वाटा आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ते ऊठसूट सत्तेवर लाथ मारीन असे म्हणतात. परंतु तसे करीत नाहीत. सरकारने विविध कर आकारून जनतेची लूट चालविली असून, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी हा पक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा आहे. पक्षात तालुक्यात अनेक गट असले तरी त्यांना एकत्र आणून तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचाच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ म्हणाले की, भाजप सरकारने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मोदींना चोर म्हणतात, तर दुसरीकडे त्यांच्याच साथीने सत्तेत भागीदार होतात, अशी टीका त्यांनी केली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment